शिवाई क्रिकेट अकादमी संघ विजयी

 


  • १६ वर्षाखालील मुलांसाठी ड्रीम ११ कप स्पर्धा

मुंबई,: दिलीप वेंगसरकर फांऊडेशनच्या वतीने १६ वर्षाखालील मुलांसाठी आयोजित केलेल्या ड्रीम ११ कप स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या लढतीत शिवाई क्रिकेट अकादमी संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत संजीवनी क्रिकेट अकादमी संघावर केवळ ५ धावांनी विजय मिळवत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना शिवाई संघाने ३४.५ षटकांत सर्वबाद १८८ धावांची मजल मारली. यश गनिगा (६०) आणि प्रितीश चाटवानी (५४) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेली ११४ धावांची भागीदारी महत्वपूर्ण ठरली. संजीवनीच्या दर्श सिंग (३२/४) आणि हर्ष आघाव (२६/३) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना संजीवनी क्रिकेट अकादमी संघाचा सलामीवीर वरद साखरकर एकाकी लढला. त्याने समोरील बाजूने सातत्याने पडझड सुरु असतानाही केवळ ५४ चेंडूत दोन चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ६७ धावा केल्या. हेमंत गौडा याने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद करून आपल्या संघाचा विजय जवळपास निश्चित केला. गौडाने (३५/३), तर अमर्त्य राजे (३८/३) आणि कर्णधार संस्कार दहेलकर (३४/२) यांनी टिच्चून गोलंदाजी करीत संघाचा विजय साकारला. हेमंत गौडा अंतिम सामन्यातील तर संस्कार दहेलकर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून यश गानिगा आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निकष नेरुरकर यांना गौरविण्यात आले. विजेत्यांना वेंगसरकर, दिलीप दोषी आणि दिनेष लाड यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

संक्षिप्त धावफलक - शिवाई क्रिकेट अकादमी - ३४.५ षटकांत सर्वबाद १८८ (यश गनिगा ६०, प्रितीश चाटवानी ५४; दर्श सिंग ३२/४, हर्ष आघाव २६/३) वि.वि. संजीवनी क्रिकेट अकादमी - ३४.२ षटकांत सर्वबाद १८३ (वरद साखरकर ६७; अमर्त्य राजे ३८/३, हेमंत गौडा ३५/३, संस्कार दहेलकर 3४/२).

भारताचे माजी महान फिरकी गोलंदाज दिलीप दोषी यांची चिकाटी आणि कठोर मेहनत घेण्याची वृत्ती ही खरोखरच अनुकरणीय असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी म्हटले आहे. पारितोषिक वितरण समारंभात दिलीप दोषी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दोषी यांना वयाच्या ३२व्या वर्षी आपला पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आणि तरीही नंतर सलग चार वर्षे खेळत त्यांनी १०० पेक्षा अधिक बळी मिळविले होते. बंगाल आणि पूर्व विभागासाठी त्यांनी खोऱ्यानी विकेट काढूनही फार उशिरा त्यांना संधी देण्यात आली होती, त्यांच्या चिकाटी आणि मेहनतीला खरोखरच सलाम. त्यामुळे तुम्ही देखील निवड होत नाही म्हणून नाराज होण्याची गरज नाही तर चिकाटी आणि मेहनत घेतली तर कधी ना कधी न्याय नक्की मिळणार हे लक्षात ठेवा असे वेंगसरकर यांनी युवा खेळाडूंना सांगितले. भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचाही वेंगसरकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान या प्रसंगी बोलताना दिनेश लाड यांनी गेली २७ वर्षे वेंगसरकर अव्याहतपणे क्रिकेट साठी देत असलेल्या योगदानाचा उल्लेख केला. क्रिकेटप्रती त्यांची निरलस सेवा पाहून प्रक्षिक्षण क्षेत्रात अधिक भरीव कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते असेही ते पुढे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post