अलिबाग (धनंजय कवठेकर) : अलिबाग तालुक्यातील भोवाळे येथील २ बहिणी अचानक प्रकृती अस्वस्थामुळे सिव्हील हॉस्पिटल अलिबाग येथे दाखल झाल्या होत्या. त्यापैकी सोनाली शंकर मोहिते, वय-३४ वर्ष हीचा दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला तर छोटी बहीण स्नेहा शंकर मोहिते, वय-३० हीची अवस्था अत्यंत गंभीर होती. उलट्याचा त्रास होत असल्याने स्नेहावर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला कामोठेतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र दिनांक २० ऑक्टोबर रोजी तिचे देखील दुःखद निधन झाले.
दरम्यान, मृत बहीण सोनाली हिचे शवविच्छेदन रेवदंडा पोलीसांमार्फत केल्यानंतर तिचा मृत्यू जेवणातील विषबाधेने झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मात्र स्नेहाने पोलिसांना मृत्युपूर्व जबाब दिला होता. त्यात तिने सांगितले की, ती व तिची मोठी बहिण सोनाली यांना तिचा भाऊ गणेश याने सूप बनवून आणून दिले आणि आईने तांब्यात पाणी पिण्यास दिले होते. त्यानंतर मृत बहिणीची आई जयमाला शंकर मोहिते, यांनी पोलिसांना दिलेल्या साक्षीत सांगितले की त्यांच्या नातेवाईकांमध्ये मालमत्तेचे वाद सुरु आहेत. या वादातूनच भावकीतील नातेवाईकांनी पाण्यात विष टाकले असावे त्यामुळेच तिच्या मुली मयत झाल्या असाव्यात असे सांगितले. यामुळे पोलिसांच्या तपासाची सुई ही शेजारी आणि नातेवाईकांकडे गेली होती. सर्व घटनाक्रम पाहता पोलीस देखील चक्रावून गेले होते.
त्यानंतर दिनांक २१ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या पथकाने गुन्ह्याचे गांभीर्य पाहून घटनेची सखोल चौकशी केली. यात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले. चौकशीमध्ये असे आढळून आले की मयत मुलींचे वडील हे वनविभाग अधिकारी म्हणून सेवेत होते. ते मयत झाल्यानंतर अनुकंपतत्वावर नोकरी मिळण्यासाठी मुलींच्या आईने आपल्या मुलींना नोकरी मिळावी आणि मुलाला मिळू नये, असा पत्रव्यवहार केला होता. याबाबत त्यांचे बऱ्याच वर्षांपासून घरात वादविवाद चालू होते. अधिक चौकशीत मुलगा गणेश शंकर मोहिते त्याची वर्तणूक चांगली नसल्याचे निदर्शनास आले. तो अनेकदा खोट्या सह्या करून बँकेतून पैसे काढत होता. वडील मयत झाल्यानंतर पतीच्या नावे असलेले घर गणेशने बहिणी आणि आईलाही विश्वासात न घेता स्वत:चे नावे करून घेतले होते. त्यामुळे आई जयमाला मोहिते यांचे देखील मुलाला नोकरी न मिळता मुलींना मिळावी असे मत होते.
याबाबत गणेश योग्य माहिती देत नसल्याने त्याच्यावरचा संशय बळावला. पोलिसांनी त्याचा मोबाईल हस्तगत केला. मोबाईलची गुगुल हिस्ट्री चेक केली असता त्याने दिनांक ११ ते १४ ऑक्टोबर या ४ दिवसांत तब्बल ५३ वेळा वेगवगळे विषारी औषधे सर्च केल्याचे आढळून आले. त्यामध्ये चव असलेले विष, वास न येणारे विष, झोपेच्या गोळ्या, विषाने किती दिवसात मृत्यू होवू शकतो इत्यादी बाबी गुगलवर सर्च केल्याचे आढळून आल्या. अधिक संशय वाढल्यामुळे त्याच्या कारची झडती घेण्यात आली. त्यावेळी कारच्या डिकीमध्ये उंदीर मारण्याचे रॅटॉल या औषधांचे माहितीपत्रक पिशवीमध्ये एका कोपऱ्यात लपवून ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांना एकूणच घटनेचा अंदाज आला तसेच संशयित भाऊच या सगळ्या मागे असल्याचे लक्षात आले.
मयत मुलींचा भाऊ गणेशने त्यांचे नावावर करून घेतलेले घर, अनुकंपावर नोकरी प्राप्त करून घेत असताना आई व बहिणींना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांचेत वाद चालू होता. दोन्ही बहिणी अविवाहित होत्या. भाऊ गणेशकडे त्या हिस्साची मागणी करीत होत्या. या सर्व कारणावरून त्याने दोन्ही बहिणींना जीवे ठार मारण्याचा निश्चय केला. दोन्ही बहिणींना त्याने सूप बनवून पिण्यासाठी दिले. त्या सूपमध्ये त्याने रॅटॉल हे विष घालून दोन्ही सख्ख्या बहिणींना जीवे ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच दिवशी भाऊ गणेश मोहिते याच्या रेवदंडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला जेरबंद केले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के हे करत आहेत.