मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते तीन कोटींचे बक्षीस
नागपूर : २०२५ ची बुद्धीबळ महिला विश्वचषक जिंकणाऱ्या ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख हिचा नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात भव्य नागरी सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्याचा सत्कार करण्यात आला आणि तीन कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याशिवाय, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडून ११ लाख रुपयांचे बक्षीस, तसेच खासदार क्रीडा महोत्सव समितीकडून सन्मान प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "महाराष्ट्र शासनाने नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षक, आधुनिक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, सकस आहार आणि परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जागतिक स्तरावर यश मिळवायचे असल्यास ही पायाभूत साधने महत्त्वाची असून ती राज्यातील खेळाडूंना उपलब्ध करून दिली जात आहेत."
दिव्याने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,"या यशामध्ये राज्य शासनाच्या पाठबळाचा मोठा वाटा आहे. नागपूर हे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. नागरी सत्कारासाठी मी सर्व नागपूरकरांचे मनःपूर्वक आभार मानते. यश थांबण्याची नाही, पुढील जागतिक स्पर्धांसाठी अधिक जोमाने तयारी करणार आहे."
या गौरव समारंभात क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संदीप जोशी, अभिजित वंजारी, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण फुके, विविध मान्यवर, क्रीडा अधिकारी, बुद्धिबळपटू, शिक्षक, विद्यार्थी आणि नागपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق