कोल्हापूर \ शेखर धोंगडे : महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यातील सुभाषनगर येथील श्री. लखन माने यांच्या कोल्हापुरी चप्पल निर्मिती कारखान्याला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली आणि कारागिरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.
"कोल्हापुरी चप्पल ही केवळ एक वस्तू नसून महाराष्ट्रातील कुशल कारागिरांनी निर्माण केलेली एक अमूल्य कलाकृती आहे. या कलेचे आकर्षण केवळ भारतालाच नाही, तर संपूर्ण जगाला आहे," असे मत मंत्री तटकरे यांनी व्यक्त केले.
या भेटीत त्यांनी चप्पल निर्मितीच्या प्रत्येक टप्प्याची माहिती घेतली आणि या उद्योगासमोरील आव्हाने समजून घेतली. या पारंपरिक उद्योगाला आधुनिकतेची जोड देण्यावरही चर्चा झाली. सांगरूळ येथील कोल्हापुरी चप्पल युनिटसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाकरिता अतिरिक्त ८६ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महिला आर्थिक विकास महामंडळाला दिल्याचेही त्यांनी सांगितले. या युनिटमध्ये १० गावांतील १५० महिला सहभागी आहेत.
कारागिरांच्या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देताना मंत्री तटकरे म्हणाल्या, "या अडचणींसंदर्भात लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून यावर निश्चितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल." या आश्वासनामुळे कारागिरांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
إرسال تعليق