मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती
ठाणे : महायुती सरकारमधील कलंकित व भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी, जनतेच्या न्याय-हक्कांचे रक्षण आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या मागण्यांसाठी ठाण्यात ‘महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन’ भव्य प्रमाणात पार पडले. हे आंदोलन ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आले होते.
आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार राजन विचारे यांनी केले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, ओवळा–माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, तसेच ठाणे जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली आणि भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर तसेच जनतेच्या हक्कांवरील अन्यायाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
नेत्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले की, महायुती सरकारच्या कारभारात अनेक मंत्री गंभीर आरोपाखाली असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. हे केवळ लोकशाही व न्यायव्यवस्थेचा अपमान नाही, तर जनतेच्या विश्वासाचा विश्वासघात आहे. त्यांनी सरकारला इशारा दिला की, भ्रष्टाचारविरोधी लढा आणखी तीव्र करण्यात येईल आणि गरज पडल्यास राज्यभर व्यापक जनआंदोलन उभे केले जाईल.
स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे परिसरात जनआक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असले तरी, घोषणाबाजी व नेत्यांच्या दमदार भाषणांनी वातावरण तापवले.
إرسال تعليق