राज्यातील स्त्रियांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य - मंत्री आदिती तटकरे

 



निर्भया पथक अधिक गतिमान करणार - गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

कोल्हापूर / शेखर घोंगडे :  राज्यातील माता-भगिनींच्या सुरक्षेला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. तसेच, प्रत्येक जिल्ह्यातील निर्भया पथक अधिक गतिमान करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित बैठकीत या दोन्ही मंत्र्यांनी पोलीस प्रशासनाच्या विविध विभागांच्या कामाचा संयुक्त आढावा घेतला.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) अण्णासाहेब जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी)  प्रिया पाटील आणि गृह (डीवायएसपी) सुवर्णा पत्की उपस्थित होते.

मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवली - आदिती तटकरे

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, पीडित महिलांना आधार देणाऱ्या 'मनोधैर्य' योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून, या योजनेची वयोमर्यादा कमी करण्यात आली आहे. त्यांनी भरोसा सेल, निर्भया आणि दामिनी पथकांना अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीडीसी) निधीची मागणी करण्याचे निर्देश दिले. तसेच, जिल्ह्यात 'वन स्टॉप सेंटर'ची संख्या वाढवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस विभागाने अधिक प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मनोधैर्य योजनेची काही प्रकरणे प्रलंबित आहेत का, अशी विचारणा केली.




सामाजिक सुरक्षा महत्त्वाची - डॉ. पंकज भोयर

गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात पोलिसांसाठी विविध ठिकाणी गृहसंकुले उभारली जात आहेत. मानवी आणि अनैतिक वाहतुकीला (ह्युमन ट्रॅफिकींग) आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने अधिक दक्ष राहावे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने 'लाडकी बहीण' योजनेतून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिले आहे, परंतु महिलांसाठी आर्थिक प्रश्नांपेक्षा सामाजिक सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे आणि ही सुरक्षा जपण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. महिला पोलिसांनी विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि इतर महिलांशी अधिक संवाद साधावा, अशी सूचना करत त्यांनी भरोसा सेलच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

तत्पूर्वी, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात पोलिसांसाठी उभारण्यात येत असलेल्या गृहसंकुलांची माहिती, सीसीटीव्ही कॅमेरे, महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची आकडेवारी, तसेच जिल्ह्यात कार्यरत असलेली निर्भया पथके, भरोसा सेल आणि महिला कक्ष यांच्या कामकाजाचे सादरीकरण केले. या बैठकीला पोलीस विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

أحدث أقدم