३९ महिन्यांत २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार
मुंबई: मुंबईची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणाऱ्या महा मुंबई मेट्रोने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मेट्रो मार्ग २अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मार्ग ७ (दहिसर ते गुंदवली) या दोन्ही मार्गांवर मिळून प्रवासी संख्येने २० कोटींचा आकडा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, केवळ ३९ महिन्यांच्या कालावधीत हा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल २०२२ रोजी या दोन्ही मार्गांचे लोकार्पण झाले होते. तेव्हापासून मुंबईकरांनी या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मेट्रोच्या लोकप्रियतेचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. पहिल्या ९ महिन्यांत १ कोटी, २५ महिन्यांत १० कोटी, ३३ महिन्यांत १५ कोटी आणि आता ४ ऑगस्ट २०२५ रोजी ३९ महिन्यांत २० कोटी प्रवाशांचा टप्पा पूर्ण झाला आहे.
हा विक्रमी टप्पा केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून, तो मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बदलाचे प्रतीक आहे. दररोज लाखो प्रवासी या मार्गांचा वापर करत असल्याने रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. वातानुकूलित, सुरक्षित आणि वेगवान प्रवासामुळे मेट्रो नोकरदार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासार्ह पर्याय ठरली आहे.
मुंबईकरांच्या या वाढत्या प्रतिसादामुळे आणि विश्वामुळेच हे यश शक्य झाले असून, भविष्यातही हा प्रवास असाच सुरू राहील, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे. हा मैलाचा दगड मुंबईला 'भविष्यासाठी सज्ज' करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
إرسال تعليق