संतप्त फेरीवाल्यांनी मनसे शहराध्यक्षांना विचारला जाब

 



    फेरीवाले आणि रिक्षाचालकांमध्ये भांडण लावू नका .

डोंबिवली / शंकर जाधव :  डोंबिवली स्टेशन परिसरात मीटर पद्धतीने रिक्षा सुरु करण्यासाठी सोमवारी मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, पालिकेचे सहायक आयुक्त यांनी डोंबिवली स्टेशन परिसराची पाहणी केली.प्रवाश्यांना सोयीस्कर रिक्षा थांबा यावर चर्चा करण्यात आली.त्यानंतर वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेत बैठक पार पडली. या निर्णयावर संतापलेल्या फेरीवाल्यांनी वाहतूक शाखेबाहेर मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांना जाब विचारला. फेरीवाल्यांना हटवून रिक्षा थांबे करून आमच्यात भांडण लावण्याचे काम करत आहात का असा प्रश्न घरत यांना विचारला.

  डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी स्टेशन परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर चार पाच दिवसांनी कल्याण येथील पालिकेच्या मुख्यालयात मनसे आमदार पाटील, पालिका आयुक्त आणी फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी यांच्यात संयुक्त बैठक पार पडली. राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंमलात आणा अशी सूचना आमदार पाटील यांनी केली. सोमवारी मनसे शहरअध्यक्ष घरत, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, रिक्षा युनियनचे पदधिकारी काळू कोमास्कर. प्रमोद गुरव, पालिकेचे सहायक आयुक्त भरत पाटील, संजय साबळे,वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी स्टेशन परिसरात मीटर रिक्षा थांबासाठी पाहणी केली.

  सदर पाहणी बाबत फेरीवाल्यांना समजले असता फेरीवाले वाहतूक शाखेसमोर आले. मनसे अध्यक्ष घरत बाहेर आल्यानंतर फेरीवाल्यांनी घरत यांना जाब विचारला. स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना मनाई केली आता रिक्षा थांबे करत आहात. मनसे फेरीवाले आणि रिक्षाचालक यांच्यात भांडण लावत आहात का ? असा जाब विचारला. यावर मनसे शहरअध्यक्ष घरत यांनी तीन दिवसात फेरीवाल्यांसाठी बैठक होणार असून नोंदणी फेरीवाल्यांना जागा निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले.


 चौकट         

 जो फेरीवालोंकी बात करेगा वही डोंबिवली मे राज करेगा ....

     संतप्त फेरीवाल्यांनी `जो फेरीवालोकी बात करेगा वही डोंबिवली मी राज करेगा` असा नारा लावत सर्व पक्षांना एका प्रकारे आव्हा न केले आहे. फेरीवाल्यांच्या बाजूने जो पक्ष उभा राहील त्या पक्षाच्या बाजूने फेरीवाले उभे राहतील असे कष्टकरी हॉकर्स युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post