कल्याण: रस्त्यावर पडलेले खड्डे आणि गणपती बाप्पाचे आगमन यामुळे पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठत होती. त्यात पडणार्या पावसामुळे प्रशासनाला खड्डे भरण्यात अडचणी निर्माण होत होत्या. मात्र काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खड्डे भरणे सोपे झाले आहे. गणेशोत्सवला काही दिवसच शिल्लक असताना लवकरात लवकर खड्डे भरण्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी पालिकेने रात्रीच्यावेळेस देखील खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे.
पावसाने आता थोडीशी उघडीप दिल्यामुळे कल्याण- डोंबिवली परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे काम येत्या ३ दिवसांत युद्ध पातळीवर करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.
कल्याण - डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या खड्डे भरण्याच्या कामाच्या ठिकाणी अचानक आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी भेट देत कामाच्या दर्जाची त्यांनी पाहणी केली. कल्याण - डोंबिवलीत खड्डे भरण्याचे काम आधीही सुरूच होते. मात्र पावसाने उघडीप दिल्याने रविवार रात्रीपासून डांबरीकरणाने हे खड्डे भरण्याचे काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे येत्या ३ दिवसांत कल्याण- डोंबिवलीतील बहुतांश रस्ते चांगल्या स्थितीत होतील ज्यामुळे गणपती बाप्पाचे आगमन सुकर होईल असा विश्वास या पाहणीनंतर महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केला.

