पेणकरांची मागणी
पेण : संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा आणि कोकणातील महत्वाचा समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी यावर्षी कोकण रेल्वेने तब्बल २४८ गणपती गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, त्या गाड्यांना पेणमध्ये देखील थांबा द्यावा, अशी पेणकरांनी मागणी केली आहे.
पेण तालुका हा गणपतीचे शहर म्हणून ओळखले जाते. पेणमधील गणपतीच्या मूर्तींना संपूर्ण महाराष्ट्रात तसेच विदेशात मोठी मागणी आहे. असे गणपतीचे शहर म्हणून ओळख असलेल्या पेणला मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने ठेंगा दाखविला आहे. कोकण रेल्वेने जरी या ठिकाणी थांबा दिला नसला तरी याबाबत येथील नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठविणे किंवा थांबा मिळवून घेणे गरजेचे होते.
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या, रायगड जिल्ह्याची महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या आणि विशेष म्हणजे जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या गणेशमूर्ती ज्या पेण तालुक्यात बनविल्या जातात त्याच परंतु राजकीय भाषणे आणि एकमेकांवर आरोप प्रत्त्यारोप करीत राहणाऱ्या या लोकप्रतिनिधींची याबाबत असलेली उदासीनता पाहून नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. कोकणातील विशेष गाड्यांना पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबे आहेत. मात्र ज्या पेणमधून गणपती बाप्पाचे भक्तांच्या घरी आगमन होते. त्या पेणला का डावलण्यात येते ? हा प्रश्न पेणकरांना दर वर्षी पडत असतो. मात्र यंदा याबाबतची नाराजी उघड झाली आहे कोकण रेल्वे प्रशासनाने गणपती काळात तरी विशेष गाड्यांना पेणमध्ये थांबा द्यावा अशी मागणी पेणकरांनी केली आहे.
