सोगाव, (अब्दुल सोगावकर) : भारताचे माजी राष्ट्रपती आणि विद्वान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि देशाचे भविष्य घडवण्यात शिक्षकांच्या समर्पण आणि योगदानाचा सन्मान या दिवशी केला जातो. यासाठी सोगाव येथील उर्दू व मराठी शाळेतील शिक्षकांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी सोगाव, मूनवली येथील मान्यवर ग्रामस्थांनी शिक्षक दिनानिमित्त सन्मानपूर्वक भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्या.
शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित मान्यवर ग्रामस्थांचे आभार व्यक्त करताना शिक्षकांनी सांगितले की, सोगाव येथील उर्दू व मराठी शाळेतील आम्हां शिक्षकांचा आपण शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी न चुकता शाळेत येऊन आमचा सन्मान करता, असा सन्मान आम्हाला यापूर्वी इतर कुठल्याही शाळेत मिळाला नाही, तसेच आपण ग्रामस्थ नेहमी आम्हां शिक्षकांना करत असलेले सहकार्य पाहून आम्ही अतिशय भारावून गेलो आहोत, असे शेवटी सांगितले.
यावेळी उर्दू व मराठी शाळेतील मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना शुभेच्छा देण्यासाठी सोगाव येथील मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समद कुर, सोगाव जमातुल मुस्लिमीन अध्यक्ष मुरतुजा कुर, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, रुस्तुम कुर, मुनावर कुर आदी मान्यवर उपस्थित होते.