सुभाष मोरे यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

 


 किशोर वैरागकर यांना हवालदारपदी बढती; डीसीपी कार्यालयात सन्मान

दिवा / आरती परब :  मुंब्रा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दिवा पोलीस चौकीतील डिटेक्शन शाखेत कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष गंगाराम मोरे यांना शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. तर त्याचवेळी पोलीस नाईक किशोर वैरागकर यांना हवालदारपदी बढती देण्यात आली आहे. या दोघांच्या पदोन्नतीमुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


पोलीस उपायुक्त (झोन १) सुभाष बुरसे यांच्या हस्ते डीसीपी कार्यालयात सुभाष मोरे यांच्या खांद्यावर नवा स्टार लावून त्यांचा औपचारिक सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त (कळवा विभाग) उत्तम कोळेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे देखील उपस्थित होते. त्यांनी सुभाष मोरे आणि किशोर वैरागकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला आणि दोघांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सुभाष मोरे यांनी नुकतीच पोलीस उपनिरीक्षकाची पात्रता परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेच्या निकालानंतर शुक्रवारी त्यांना अधिकृतरित्या पदोन्नती देण्यात आली.


मोरे हे गेल्या ३३ वर्षांपासून पोलीस खात्यात सेवा बजावत असून त्यांनी वर्तक नगर पोलीस ठाणे, मुंब्रा पोलीस ठाणे, शील डायघर पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेत आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि सचोटीच्या कार्यशैलीने ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि संयमी भूमिकेमुळे नागरिकांत तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याबाबत विशेष आदराची भावना आहे. किशोर वैरागकर यांनीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत आपले कर्तव्य निभावले आहे. त्यांच्या हवालदारपदी बढतीमुळे त्यांच्याही सेवेला उचित सन्मान मिळाल्याचे मानले जात आहे. या दोन्ही पदोन्नतीमुळे दिवा परिसरातील पोलीस यंत्रणेत नवीन उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली असून, स्थानिक नागरिकांनीही दोघा अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم