पिछाडीवरून जमशेदपूर एफसीचा विजय


 ईस्ट बंगाल एफसीचे आव्हान संपल्यात जमा

कोलकाता :  इंडियन सुपर लीगच्या २०२२-२३ ( आयएसएल) आजच्या सामन्यात ईस्ट बंगाल एफसीला आघाडी घेऊनही घरच्या मैदानावर हार मानावी लागली. जमशेदपूर एफसीने दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करताना २-१ असा विजय मिळवला. पराभवामुळे ईस्ट बंगालच्या खेळाडू, प्रशिक्षक व प्रेक्षकांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले. प्ले ऑफच्या शर्यतीतून त्यांचे आव्हान आता जवळपास संपल्यात जमा झाले आहे. जमशेदपूरसाठी हॅरी सॉयर व ऋत्विक दास यांनी गोल केले, तर ईस्ट बंगाल एफसी साठी क्लेईटन सिल्वाने गोल केला.

हिरो आयएसएलच्या यंदाच्या पर्वातील दोन्ही संघांची कामगिरी काही खास झालेली नाही. मागच्या पर्वातील लीग शिल्ड विजेत्या जमशेदपूर व ईस्ट बंगाल एफसीच्या प्ले ऑफच्या आशा अंधुक होत्या. जमशेदपूरने सुरुवातीपासून आक्रमण केले. पण, पहिल्या गोलचा मान ईस्ट बंगालने पटकावला. १२व्या मिनिटाला जमशेदपूरचा गोलरक्षक विशाल यादव याच्याकडून चूक झाली अन् अॅलेक्स लिमाने टोलवलेला चेंडू यादवने रोखला, परंतु तो हातात राखण्यात अयशस्वी ठरला. तेव्हा जवळच उभ्या असलेल्या क्लेईटन सिल्वाने संधीचं सोनं केलं अन् सोपा गोल करून ईस्ट बंगालला आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला डॅनिएल चुक्वूने बरोबरीचा गोल करण्याचा सुरेख प्रयत्न केला, परंतु त्याने मारलेला चेंडू पोस्टच्या अगदी जवळून बाहेर गेला.

१७व्या मिनिटाला ईस्ट बंगालला बॉक्सबाहेर फ्री किक  मिळाला. मात्र, यावेळेस विशाल यादवने कोणतीच चूक केली नाही. १९व्या मिनिटाला जमशेदपूरसाठी बरोबरीचा गोल करण्याची सोपी संधी निर्माण केली होती. पण, बोरीस सिंग चूकला अन् त्याने त्वरीत सहकाऱ्यांची माफी मागितली. आघाडी घेणाऱ्या ईस्ट बंगालच्या आक्रमणाची धार तीव्र होताना दिसली. जमशेदपूरनेही गोल करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते, परंतु त्यांना अंतिम टच देण्यापासून ईस्ट बंगालच्या बचावपटूंनी रोखले. पहिल्या हाफमध्ये ईस्ट बंगालने आघाडी कायम राखली. जमशेदपूरने दोन सोप्या संधी गमावल्या नसत्या तर हा हाफ त्यांच्या नावावर राहिला असता.


६१व्या मिनिटाला ईस्ट बंगालच्या बचावपटूंनी पेनल्टी क्षेत्रातच गोंधळ घातला हॅरी सॉयरने बरोबरीचा गोल केला. आता सामन्यात खरी चुरस सुरू झाली होती, कारण प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखण्यासाठी दोन्ही संघांसमोर ३ गुण हा एकच पर्याय आहे. ७१व्या मिनिटाला क्लेईटन सिल्वा पुन्हा आघाडी घेण्यासाठी चेंडू घेऊन पेनल्टी क्षेत्रात शिरला होता अन् त्याने जमशेदपूरच्या गोलरक्षक यालाही चकवले. पण, प्रतिक चौधरीने बचाव केला. दुसऱ्या हाफ मध्ये ईस्ट बंगालच्या खेळाचा दर्जा खालावलेला स्पष्टपणे दिसला.  ऋत्विक दासने ८५व्या मिनिटाला जर्मनप्रीत सिंगकडून आलेला चेंडू हेडरद्वारे गोलजाळीत पाठवला अन् जमशेदपूरला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ९०व्या मिनिटाला जर्मनप्रीतचा एक प्रयत्न ईस्ट बंगालच्या गोलरक्षकाने रोखला. जमशेदपूरने २-१ असा हा सामना जिंकून यंदाच्या पर्वातील दुसऱ्या विजयाची नोंद केली.

निकाल : जमशेदपूर एफसी २ ( हॅरी सॉयर ६१ मि., ऋत्विक दास ८५ मि.) विजयी वि. ईस्ट बंगाल एफसी १ ( क्लेईटन सिल्वा १२ मि. ) 

Post a Comment

Previous Post Next Post