कॅनडाचा कतारवर ६-० ने दणदणीत विजय
व्हँकुव्हर (एपी) : जोनाथन डेव्हिडच्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर कॅनडाने विश्वचषकाच्या इतिहासातील आपला पहिला विजय नोंदवत कतारचा ६-० असा धुव्वा उडवला. या विजयासह कॅनडाने बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
सामन्यात कतारच्या दोन खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आल्याने त्यांचा संघ नऊ खेळाडूंवर आला. पहिल्या सत्रात ताजोन बुकाननविरुद्ध केलेल्या आव्हानासाठी होमान अहमदला, तर उत्तरार्धात इस्माईल कोनेवर गंभीर टॅकल केल्यामुळे असीम मादिबोला मैदानाबाहेर पाठवण्यात आले. दुखापतग्रस्त कोनेला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले.
सायले लारिनने १६ व्या मिनिटाला कॅनडाचे खाते उघडले. त्यानंतर जोनाथन डेव्हिडने २९ व्या आणि पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत गोल करत संघाला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. कोनेच्या जागी मैदानात उतरलेल्या नॅथन सॅलिबाने ६४ व्या मिनिटाला फ्री-किकवर गोल करत आघाडी ४-० केली. ७५ व्या मिनिटाला मोहम्मद मनाईच्या आत्मघातकी गोलमुळे कॅनडाची आघाडी आणखी वाढली. अतिरिक्त वेळेत डेव्हिडने आणखी एक गोल करत हॅटट्रिक पूर्ण केली आणि या विश्वचषकात अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीनंतर तीन गोल करणारा तो दुसरा खेळाडू ठरला.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी 'फिफा'चे अध्यक्ष गियानी इन्फँटिनो यांच्यासमवेत हा सामना पाहिला. दरम्यान, ब गटातील अन्य सामन्यात स्वित्झर्लंडने बोस्निया-हर्झगोव्हिनाचा ४-१ असा पराभव केला.
