राज्यात पावसाची हजेरी




मुंबई :  ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी 
 संकटात सापडला होता. मात्र, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात बहुतांश भागात गुरुवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. दहीहंडीचा जल्लोष सगळीकडे असताना पावसाच्या आगमनामुळे गोविंदा खुश झाले आहे. वाढत्या उकड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना देखील दिलासा मिळाला आहे. देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला.

मुंबईसह पालघर आणि ठाणे परिसरातही जोरदार पाऊस झाला. पालघरमध्ये तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाल्याने येथील शेतकरी खुश झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली होती. आज राज्यातील नंदुरबार, वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. नंदुरबार नवापूर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने दांडी मारली होती. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज नवापूर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस बरसला. धुळे जिल्ह्यात १७ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली. धुळे शहरासह, साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यात अनेक भागांमध्ये पावसाने हजरी लावली. जळगाव जिल्ह्यांत रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे बळीराजा हा सुखावला आहे. वाशिम जिल्ह्यात बुधावारी रात्री सर्वत्र जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे खरिपाच्या सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांना जीवदान मिळाले आहे.

वाशिम जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. तर मारठवड्यातील परभणी शहरात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post