एसटी कामगार पुन्हा संपावर जाणार


  • ११ आणि १२ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर उपोषण 
  • १३ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण

मुंबई: गणेशोत्सवच्या आधी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने आपल्या विविध २९ प्रलंबित मागण्यांसाठी १३ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गणेशोत्सवात नागरिकांचे हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षां सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यावेळी जवळपास ३ महिने आंदोलन चालले होते. तेव्हा शासनाप्रमाणे देय असणारा ४२ टक्के महागाई भत्ता, प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा फरक, मूळ वेतनात वेतनवाढीमुळे हजारो सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती आणि दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतरही अनेक  मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, अजूनही एसटी महामंडळाने या मागण्या मान्य न झाल्याने एसटी महामंडळाने बेमुदत उपोषणापूर्वी ११ व १२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत, जर या दोन दिवसात सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी चर्चा करण्यास न बोलावल्यास १३ पासून राज्य भरात एसटी कामगार संघटनेतर्फे उपोषण पुकारले जाणार आहे. कामगार संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या बैठकीत आंदोलनासंदर्भात निर्णय घेण्यात आला. आंदोलनाची नोटीस एसटी प्रशासनाला देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान उपोषण आंदोलनात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाचे सामान्य प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी दिले आहेत. 



Post a Comment

Previous Post Next Post