नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत शुक्रवारपासून १८ वी जी २० शिखर परिषद संपन्न होणार आहे. त्यासाठी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. केंद्र व राज्य सरकारकडून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. ९-१० सप्टेंबरला जी २० राष्ट्राध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. दिल्लीतल्या प्रगती मैदान कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यासाठी तयारीची जोरदार लगबग सुरू आहे. जगभरातील अनेक देशांचे प्रमुख, अधिकारी जी २० शिखर परिषदेसाठी उपस्थित राहणार असल्यामुळे शहरातील अनेक मार्ग शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस बंद राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काही भागांतील बाजारपेठाही बंद राहणार आहेत. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलिसांसह श्वानपथके संपूर्ण परिसरात गस्त घालत आहेत.
जगभरातील अनेक देशांचे प्रमुख, अधिकारी जी २० शिखर परिषदेसाठी उपस्थित राहणार असल्यामुळे ८,९ आणि १० सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीत शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये बंद असणार आहे. अनेक देशातील राष्ट्रप्रमुख या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यासाठी दिल्लीतल्या ३५ पंचतारांकित हॉटेलमधल्या ३५०० रुम्स बुक करण्यात आल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतभेटीवर येणार आहेत. त्यांचा मुक्काम दिल्लीतल्या आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये असेल. यासाठी अनेक राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख, त्यांच्या सरकारचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. (रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आणि मेक्सिकोचे आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचा अपवाद असेल) जी-२० च्या सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांसह भारताने अनेक आंतरराष्ट्रीय संस्था जसे की, संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि जागतिक व्यापार संघटनांचे पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

