ब्रिस्बेन: राफेल नदालने (Rafael Nadal) मंगळवारी ब्रिस्बेन इंटरनॅशनल ओपनर चॅम्पियनशिप स्पर्धेत माजी यूएस ओपन चॅम्पियन डॉमिनिक थिमचा पराभव करत वर्षाची सुरुवात विजयाने केला आहे. या विजयामुळे नदाल इज बॅकची जणू घोषणाच केली असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. एक तास ३० मिनिटे चाललेल्या या सामन्यात नदालने थिमचा ७-५, ६-१ असा पराभव केल्याने नदालने शानदार पुनरागमन केले आहे.
ऑस्ट्रेलियातील पॅट राफ्टर एरिना येथील कोर्टवर २२ वेळा ग्रँडस्लॅम पटकावलेल्या नदालला दुखापतीतून सावरल्यानंतर पाहण्यासाठी सगळ कोर्ट भरले होते. पहिला सेट ७-५ ने जिंकल्यानंतर दुसर्या सेटमध्ये देखील आपल्या शानदार खेळाचे प्रदर्शन करत ६-१ ने विजय संपादन करत स्पर्धेच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला.
जगातील नंबर १ नोव्हाक जोकोविचने २२ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक खास स्टोरी पोस्ट करून पुनरागमनाचे स्वागत केले आहे. दुखापतीमुळे जवळपास वर्षभरानंतर नदालने पुनरागमन केले असल्याचे त्याने म्हटले आहे.
नदालचा हा ३४९ दिवसांतील पहिला स्पर्धात्मक एकेरी सामना होता, तो शेवटचा ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ मध्ये खेळला होता. त्याचा ब्रिस्बेन येथील सामना पाहण्यासाठी कोर्ट खचाखच भरले होते. या सामन्यात त्याचे वडील देखील होते.