Adani Group : हिंडनबर्ग प्रकरण सेबीकडे ठेवल्याने अदानी समूहाचे शेअर्स वधारले

 

३ ते १८ टक्‍क्‍यांची वाढ

नवी दिल्ली:  अदानी समूहाने आपल्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत फेरफार करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्च संस्थेने केला होता. त्यावरून हा तपास सेबीकडून काढून एसआयटीकडे द्यावा, याबाबतची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर हे प्रकरण सेबीकडे कायम ठेवत एसआयटीकडे देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याचा अदानी ग्रुपच्या शेअर्सवर मोठा फायदा झाला आहे. बुधवारी देण्यात आलेल्या या निर्णयामुळे इंट्राडे ट्रेडमध्ये अदानी समूहाच्या समभागात ३ ते १८ टक्‍क्‍यांची वाढ झाली, ज्यामुळे समुहाचे एकूण बाजार भांडवल ₹ १५ लाख कोटींहून अधिक झाले आहे.  

अदानी समूहासाठी अनुकूल असलेल्या या निर्णयानंतर, अदानी एंटरप्रायझेसच्या प्रमुख कंपनीच्या समभागांनी ९ टक्क्यांहून अधिक उसळी मारली, तर अदानी पोर्ट्सचे शेअर्स ६ टक्क्यांनी वाढून बीएसईवर १,१४४ रुपयांवर पोहोचला आहे. ५२ आठवड्यानंतर हा उच्चांक पहावयास मिळाला. अदानी एनर्जी सोल्युशन्सचे समभाग १८ टक्क्यांनी वधारले तर अदानी पॉवरचे शेअर्स सुमारे ५ टक्क्यांच्या वाढीसह ५४४.६५ रुपयांवर व्यवहार करत आहेत. 

अदानी टोटल गॅसचे शेअर्स १० टक्क्यांनी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स जवळपास ९ टक्क्यांनी वाढले. अदानी विल्मारच्या शेअर्समध्ये जवळपास ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय, NDTV चे शेअर्स जवळपास ११ टक्क्यांनी वाढले तर अंबुजा सिमेंटचे शेअर्स सुमारे ३ टक्क्यांनी वाढून ५४९ वर पोहोचले आहेत. एसीसीचे शेअर्सही जवळपास ३ टक्क्यांनी वाढले.

सेबीने २४ पैकी २२ प्रकरणांमध्ये तपास पूर्ण केला असल्याचे सांगत उर्वरित २ प्रकरणांमध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत तपास पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने सेबीला दिले आहेत.


 


 

Post a Comment

Previous Post Next Post