वसई, : उन्हाळ्यात दरवर्षीप्रमाणे वसई भागात पाणीटंचाईच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. पालिका क्षेत्रात गरजेच्या ठिकाणी दररोज २३ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
शहराची गरज लक्षात घेता तीन-चार महिन्याआधीपासूनच सूर्या धरणाच्या माध्यमातून एमएमआरडीकडून वसई-विरारला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र यंदा उन्हाळ्याची झळ आतापासूनच बसू लागल्याने पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
पालिकेकडून वाढीव पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. पाण्याची गरज भागवताना नागरिक बोअरवेल, विहिरी, तलावांतील पाण्याचा आधार घेऊन आपली दैनंदिन गरज भागवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
उन्हाळा सुरू झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी सततच्या वापराने खाली खाली जात आहे. यात कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदळ, सागपाडा, गिदराई पाडा, सातिवली, गोखिवरे, वैतरणा परिसर येथे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. दुर्गम भागातील कामण परिसरातील गावपाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे.
सद्य:स्थितीत प्रभाग समिती जी मधील कामण परिसर, प्रभाग समिती एफमधील पेल्हार व सी मधील वैतरणा अशा ठिकाणी प्रतिदिन २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सुरुवातीला कूपनलिका, विहिरी, तलाव अशा नैसर्गिक जलस्त्रोतांत पाणी सहज उपलब्ध होत होते. परंतु अनिर्बंध पाणी उपसा, सिमेंट काँक्रीटची तयार झालेली जंगले यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. उपलब्ध पाणीसाठा उन्हाळ्यात कमी होऊ लागला आहे.