दिव्यात चाळीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला


१० जणांची सुटका

दिवा \ आरती परब  : दिवा पश्चिमेतील एन.आर. नगर, गावदेवी मंदिराजवळ रविवारी रात्री १०.२९ वाजता संजय म्हात्रे चाळीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला. तळमजला व एक मजला अशा रचनेची ही चाळ सुमारे १५ ते २० वर्षे जुनी असल्याची माहिती मिळते.


घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी दोन पिकअप वाहनांसह, अग्निशमन दलाचे जवान एक फायर व एक रेस्क्यू वाहनासह तसेच टोरंट पॉवरचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.


गॅलरीचा भाग कोसळल्यामुळे पहिल्या मजल्यावरील तीन सदनिकांमध्ये राहणारे दहा रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाने तत्काळ कार्यवाही करत सर्वांना सुखरूप बाहेर काढले. मात्र गॅलरीचा उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असल्याने परिसर सील करण्यात आला आहे.


सदर चाळीत एकूण ४० सदनिका असून त्यापैकी ३० सदनिका सुरक्षेच्या कारणास्तव रिकाम्या करण्यात आल्या आहेत. अंदाजे ३५ ते ४० रहिवाशांना तात्पुरते त्यांच्या नातेवाईकांकडे हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.




Post a Comment

Previous Post Next Post