जळगाव : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गोरगरीब व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लोकाभिमुख उपक्रम पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचा जिल्हा नियोजन समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
हा सत्कार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जनप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री पाटील यांनी करनवाल यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सांगितले की, “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेली पुढाकार वृत्ती व लोकाभिमुख निर्णय महत्त्वाचे ठरले आहेत.”
सत्कार स्वीकारताना मिनल करनवाल यांनी सांगितले की, शासनाने आखून दिलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रत्येक विभाग तत्पर राहील.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी केलेला हा सन्मान केवळ एका अधिकाऱ्याचा नसून संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या विकासात्मक कार्याचा गौरव असल्याचे नमूद केले.