अलिबागमध्ये स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती मार्गदर्शन कार्यक्रम

 जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन




अलिबाग (धनंजय कवठेकर) :   रायगड जिल्ह्यातील यशस्वी स्पर्धा परीक्षा केंद्र स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोमनाथ घार्गे- जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड, वंदना आंब्रे-प्रोफेसर ज्युनिअर कॉलेज जा.र.ह.कन्याशाळा, अलिबाग यांचे शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 


सदर कार्यक्रमांमध्ये सन्माननीय पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपला शाळेतील विद्यार्थी ते MPSC वर्ग एक अधिकारी असा संघर्षमय प्रवास सांगितला. नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या आर्थिक समस्येमुळे आपल्याला कसे शिक्षण मधून थांबवावे लागले व तिथून आयुष्याला मिळालेली कलाटणी तथा एमपीएससीच्या माध्यमातून निवड होई पर्यंत त्यांना ज्या संघर्षमय प्रवासातून जावे लागले हे सांगितले. संघर्षाचा सामना प्रत्येकाला करावाच लागतो परंतु हार न मानता जे ठरवले ते प्राप्त करण्यासाठी आपण कठोर मेहनत, सातत्य व जिद्दीने उभे राहिले पाहिजे मग आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचता येते. 




स्पर्धा विश्व अकॅडमी तसेच विविध  सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तपस्वी गोंधळी व सुचिता साळवी यांच्या माध्यमातून रायगड अलिबाग मध्ये हे स्पर्धा परीक्षांचे क्लासेस होत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम करत आहेत हे कौतुकास्पद आहे. जो जिद्द हरत नाही तो कायम यशस्वी होतो. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांचा अनुभव नसलेले लोक आपल्याला भेटतात आणि स्पर्धा परीक्षेतील अपयशाबद्दल बोलतात; अनिश्चिती बद्दल सांगतात त्यामुळे घाबरून न जाता आपण जे करतोय ते जर बरोबर असेल तर चालत रहा असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले.


 विविध उदाहरणातून कशाप्रकारे ते स्वतः आणि त्यांच्या समूहातील त्यांचे मित्र वेगवेगळ्या उच्च पदांवर निवडले गेले याचा संघर्षमय प्रवास त्यांनी सांगितला. याच बरोबर आता स्पर्धा परीक्षांचे वातावरण उत्तम आहे विद्यार्थ्यांना फक्त मेहनत घेण्याची आवश्यकता आहे, अपयशाला न घाबरता, एकदा अपयश आलं तरी पुढे आपण अभ्यास सुरू ठेवला पाहिजे. काही वेळेस अपयश आपल्याला काही तरी मोठे मिळवण्यासाठी मदत करू शकते असे त्यांनी सांगितले जसे तुम्ही जर एखाद्या परीक्षेत अपयशी झालात तर पुढल्या वेळेस जास्त जिद्दीने, मेहनतीने अभ्यास करून आणखी मोठे पद आपण मिळवू शकतो.




आपला जास्तीत-जास्त वेळ हा अभ्यासाला द्या, ग्रुप स्टडी महत्त्वाचा असतो, पुस्तकांचं वाचन जास्तीत-जास्त करणे गरजेचे आहे, सतत सराव केला पाहिजे. ग्रुप डिस्कशन वर भर द्या यश हे मिळेलच असे देखील ते म्हणाले. जा.र.ह. कन्या शाळा ज्युनिअर कॉलेजच्या प्रोफेसर वंदना आंब्रे यांनी देखील उपस्थित बहुसंख्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देताना आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले त्यांनी बोलताना आपली विद्यार्थिनी तपस्वी गोंधळी यांचे कौतुक केले.


 तपस्वी गोंधळी यांनी स्वतःला सामाजिक क्षेत्रामध्ये झोकून देत सामाजिक बांधिलकी म्हणून आज आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या प्रवाहामध्ये आणण्याकरिता स्पर्धा विश्व अकॅडमी स्थापन करून हा एक यशस्वी प्रयत्न केला ज्यामुळे आज रायगड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी विविध पदांवर काम करत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता  काशिनाथ साळवी यांनी केले.सदर कार्यक्रमाला चेंढरे ग्रामपंचायतच्या सदस्या प्रणिता म्हात्रे, स्पर्धा विश्व अकॅडमीचे किरण काशिनाथ साळवी आदी मान्यवर व रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post