बर्याच दिवसांपासून बाहेर फिरायला गेलोच नव्हतो. ऑफिस आणि घर ह्या रोजच्या रुटीनमुळे खूप कंटाळा आला होता म्हणूनच रविवारी फिरायला जायचा प्लॅन केला. आम्ही दोघ, दीर आणि जाऊबाई असे चौघे गेलो मुळशीला. रिमझिम पाऊस, डोंगरांवर उतरलेले ढग खूप छान वातावरण होत. पावसाचे दिवस असूनही आमच्या चौघांपैकी एकालाही रेनकोट किंवा छत्री बरोबर घ्यायला पाहिजे असे वाटले नाही. तिकडे गाडीतून उतरताना रेनकोट आणि छत्री आठवली. मग काय झाल चालू एकमेकांचे नाव घ्यायला. तू आठवण केली नाही तू आठवण केली नाही. त्यावरून थोडी मस्ती करत चालत असतानाच नवरोबाने म्हंटल भक्तीला फक्त दरवर्षी नवीन छत्री पाहिजे वापरणार तर नाही. अस म्हणताच दीर आणि जाऊ माझ्याकडे बघायला लागले. पुण्यात छत्रीपेक्षा रेनकोटचा वापर जास्त होतो. कुठेही जायच म्हटल तर बाइकशिवाय पर्याय नाही म्हणून रेनकोट लागतोच. असे असताना हिला छत्री का लागते असा प्रश्न त्या दोघांना पडला होता. एकीकडे नवर्याची बडबड सुरूच होती. पाऊस असला तरीही छत्री बॅगेतून बाहेर काढत नाही भक्ती असे म्हणताच मी पटकन म्हटल भिजेलना ती, असे म्हणताच सर्वच हसायला लागले. हसता हसता मी मात्र जुन्या आठवणींमध्ये कधी रमली माझ मलाच कळलं नाही.
शाळा, कॉलेजमध्ये असताना मी छत्री उघडायची नाही. पाऊस आला की, मैत्रिणीच्या छत्रीमध्ये शिरायच. त्याही काही बोलायच्या नाही. मस्त एकमेकींच्या खांद्यावर हात ठेऊन गप्पा मारत मस्ती करत जाण्याची मज्जाच वेगळी होती. पण जोरात पाऊस आला की भिजायला व्हायचं. कधी ओरडायच्या तर कधी छत्री आणली नाही म्हणून माझ्यावर रागवायच्या. घरी विसरल्याच कारण देऊन मी ही मोकळी व्हायची. शाळेत असताना पाऊस आला म्हणून मी नेहमीप्रमाणे मैत्रिणीच्या छत्रीमध्ये शिरली. हळूहळू पावसाचा जोर वाढू लागला आम्ही दोघी पण भिजू लागलो पुस्तक भिजतील ह्या भीतीने मी हळूच बॅगेतून छत्री काढली. माझी छत्री बघून मैत्रीण खूप चिडली छत्री आहे तरी उघडत नाही म्हणून ओरडली तिचा राग बघून मी पण मग तिला म्हटल छत्री भिजेल ना माझी तुला काय जात बोलायला अस म्हणताच सर्वच जणी हसायला लागल्या. तेव्हापासून माझ्या बॅगेत छत्री नसल्याची खात्री केल्याशिवाय त्या मला त्यांच्या छत्रीत घेत नव्हत्या.
कॉलेजमध्ये गेल्यावर नवीन मैत्रिणी झाल्या त्यांना कुठे माझी ही सवय माहीत होती मग तिकडे पण असच हळूहळू त्यानाही समजल माझ्या ह्या सवयी बद्दल त्याही मला छत्री उघडायला लावायच्या मग मी पण त्यांच्या पुढची होती. पाऊस आला की कुठे तरी आडोशाला उभं राहायच. पाऊस गेला की जाऊ म्हणायच त्यांना. लेक्चर अटेंड नाही केल तर नोट्स मिळणार नाही गं भक्ती...अशा बोलायच्या. मी छत्री उघडणार नाही मला छत्रीत घ्या तरच जाऊया म्हणायचे. घ्यायच्या मला मग त्या छत्रीत पण मला सोडून कधी गेल्या नाहीत. रागवत, बडबडत, ओरडत का होईना पण मला घेतल्याशिवाय जात नव्हत्या. जोरात पाऊस आला आणि जर का मला छत्री उघडायला लागली तर मग ती छत्री मुद्दामून अशी पकडायची की छत्रीच पाणी मैत्रिणींच्या अंगावर पडेल आणि ती भिजेल नाही तर मग सर्वांच्या अंगावर पाणी उडवत जायच मग लगेच मला त्यांच्या छत्रीत बोलवायच्या. मग मी रागवायचे त्यांच्यावर माझी छत्री ओली तर झाली मग मी का येऊ आता तुमच्या छत्रीत म्हणायचे. त्यावर त्या म्हणायच्या ओली छत्री आम्ही पकडतो आता तरी ये...
पूर्वी पावसाळा आला की नवीन छत्रीचे वेध लागायचे. वापरली जरी नाही तरी दरवर्षी नवीन छत्री घ्यायचे. सवयीप्रमाणे आताही छत्री घ्यायला आवडत. नवरोबा म्हणतो छत्री घेऊन कुठे फिरणार आहेस रेनकोट घे गाडीवर बर पडत. छत्री आणि रेनकोटच्या वादात कसलीच खरेदी केली नाही. रस्त्याला जातानायेताना दुकानात लटकवलेल्या छत्र्या फक्त पाहण्याच काम करते.
✍️ भक्ती पांढरा - शानभाग
.png)

.jpeg)
.jpeg)