ठाण्यात आता दर सोमवारी १० टक्के पाणीकपात

 

बुधवारचा निर्णय बदलला; २ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

ठाणे : अल्-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने पाणीपुरवठ्याचे सुधारित नियोजन केले आहे. त्यानुसार, आता बुधवारऐवजी प्रत्येक सोमवारी १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. येत्या २ नोव्हेंबर २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

यापूर्वी दर बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, २८ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात स्टेम वॉटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत दर सोमवारी शटडाऊन घेऊन १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य शासनाने अल्-निनोच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने आणि प्राधान्यक्रमाने व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ठाणे महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.

या पाणीकपातीचा परिणाम घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, ईटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा तसेच कळव्याच्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.

नागरिकांनी पाणीकपातीपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post