लेक लाडकी योजनेसाठी आता महाडीबीटी २.० वरून ऑनलाइन अर्ज करता येणार

 


अंगणवाडी केंद्रावर जाण्याची गरज नाही; अर्जाची स्थितीही ऑनलाइन पाहता येणार

मुंबई : राज्य सरकारच्या लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या योजनेअंतर्गत अर्ज नोंदणी, छाननी, मंजुरी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.

शासकीय प्रक्रियांच्या पुनर्रचनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या सुविधेमुळे विशेषतः अंगणवाडी केंद्र कार्यरत नसलेल्या भागांतील लाभार्थ्यांना अर्ज करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. राज्यातील कोणत्याही भागातील पात्र लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच, अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्यस्थितीही महाडीबीटी २.० पोर्टलवर पाहता येणार आहे.

लेक लाडकी योजनेचा लाभ थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. आतापर्यंत राज्यातील २ लाख ९८ हजार ६९५ लाभार्थ्यांना योजनेचा पहिला लाभ मिळाला आहे.

ऑनलाइन अर्ज सुविधेमुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होणार असून, पात्र मुलींना योजनेचा लाभ मिळविण्याचा मार्ग अधिक सोपा होणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post