अंडी महागल्याने अंडीप्रेमी नाराज
मुंबई \ कविता गरुड : श्रावणात चिकन, मांस, अंडी अनेकांसाठी वर्ज्य असते. त्यामुळे अनेक जण श्रावणापूर्वीच त्यावर तुटून पडतात. एक महिना श्रावण पाळावा लागत असल्याने अनेक जण ऐन आषाढातच चंगळ करतात. पण अंडी प्रेमींची चिंता वाढली आहे, कारण अचानक अंड्यांचे भाव वधारले आहेत. आषाढातच अंड्यांसाठी ग्राहकांच्या खिशावर बोजा पडला आहे. १२ नग अंडीसाठी आता जादा पैसा मोजावे लागत आहे.
श्रावण आल्याने आता उन्हाळा संपल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर दुसरीकडे अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर ७८ ते ९० रुपये डझनपर्यंत पोहोचले आहेत. मार्चमध्ये मुंबईत १०० अंडींसाठी घाऊक दर ४७० रुपये होता, तो जूनच्या अखेरीस ५९१ रुपये इतका झाला आहे.
उन्हाळ्यात लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला होता त्यामुळे अनेक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याने याचा परिणाम अंडी उत्पादनावर झाला. नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी (एन इ सीसी ) च्या अहवालानुसार जून २०२५ मध्ये अंड्याचा दर पाच वर्षांतील सर्वाधिक आहे. मार्चमध्ये १०० अंड्यांचा घाऊक दर ४७० रुपये होता, तो जूनअखेर ५९१ रुपयांवर पोहोचला आहे. पुण्यात दर १५ दिवसांत ६६ वरून ८४ रुपयांपर्यंत वाढले आहेत. ही वाढ थांबण्याची चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत. त्यामुळे संडे हो या मंडे कैसे खाये अंडे असा प्रश्न अंडीप्रेमींना पडला आहे.