डब्लूडब्लूई सुपरस्टार आणि हॉलीवूड अभिनेता जॉन सीना याने एक मोठा निर्णय घेत आपले लाखो-कोट्यवधी चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. २०२५ हे वर्ष त्याचे डब्लूडब्लूई मधले शेवटचे वर्ष ठरणार असून, त्यानंतर तो रेसलिंगपासून संन्यास घेणार आहे. या निवृत्तीनंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेणार आहे. जॉन सीन लवकरच बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबत एका मोठ्या अॅक्शन-कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे.
एका मुलाखतीत सीना म्हणतो, “माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझी पत्नी शाय शरियात्जादेह. तिच्यासोबत चांगले आयुष्य जगणं, माझं आरोग्य सांभाळणे हेच आता माझे प्राधान्य असल्याचे त्याने सांगितले.
जॉन सीना लवकरच अॅक्शन-कॉमेडी शैलीतील एका बहुप्रतिक्षित चित्रपटात बॉलिवूडची आंतरराष्ट्रीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. ‘Heads of States’ नावाचा हा सिनेमा 2 जुलै 2025 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन इल्या नैशुलर करत असून, यामध्ये जॉन सीना, प्रियंका चोप्रा आणि ब्रिटिश अभिनेता इद्रिस एल्बा यांच्यासह पॅडी कंसिडाइन, स्टीफन रूट, कार्ला गुगिनो, जॅक क्वेड आणि सारा नाइल्स हे नामवंत कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.
जॉन सीनासाठी ही काही पहिली अभिनयाची चव नाही. याआधी ‘Fast & Furious 9’, ‘The Suicide Squad’, आणि ‘Peacemaker’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. मात्र प्रियंका चोप्रासोबतची ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे. एका वेगळ्या ढंगातील अॅक्शन आणि विनोदाच्या मिश्रणात दोघांची केमिस्ट्री पाहणे चाहत्यांसाठी मेजवानी ठरणार आहे.
रेसलिंगच्या दुनियेत ‘नेव्हर गिव अप’ या घोषवाक्याने तरुणांना प्रेरणा देणारा जॉन सीना आता म्हणतो, “2025 मध्ये मी माझा रेसलिंग करिअर सन्मानाने संपवू इच्छितो. पण डब्लूडब्लूईसोबतचं माझं नातं कधीच संपणार नाही. मी नेहमीच या संस्थेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कार्यरत राहीन.” म्हणजेच, रिंग सोडली तरी सीना WWE परिवाराचा कायम सदस्य राहणार आहे.
दुसरीकडे, प्रियंका चोप्रासाठीही हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. ‘क्वांटिको’, ‘सिटाडेल’ आणि ‘द व्हाईट टायगर’नंतर ती पुन्हा एकदा मोठ्या आंतरराष्ट्रीय कास्टसोबत झळकणार आहे. भारतीय अभिनेत्री म्हणून प्रियंकाचा जागतिक स्तरावरचा विस्तार आणि प्रभाव हे चित्रपटातून पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.
2025 हे वर्ष जॉन सीनासाठी एका पर्वाचा शेवट आणि दुसऱ्याची सुरुवात ठरणार आहे. रेसलिंगच्या रिंगमधून अभिनयाच्या स्क्रीनवर – सीना आता नव्या भूमिकांसाठी सज्ज झाला आहे.