महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पतपेढीचे उल्लेखनीय कार्य
दिवा \ आरती परब : सहकारातून समाज उभारणीचे ध्येय बाळगणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि., उल्हासनगर या संस्थेचा दिवा शाखेचा नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक गेनबा जगन्नाथ मांढरे (आबा), संस्थेचे अध्यक्ष शंकर भिकू मांढरे, कार्यकारी संचालक विठ्ठल नथू तुपे, संचालक प्रकाश पाटील, संतोष फणसे, शाखा व्यवस्थापक शुभांगी राजेंद्र शेलार, संस्थेचे मुख्य कर्ज अधिकारी राजेंद्र शेलार, तानाजी मांढरे, संतोष मांढरे तसेच शाखेतील कर्मचारी नरेश पाटील, प्रणाली सावंत, कुमारी प्रेरणा पवार, दैनंदिन ठेव प्रतिनिधी व मान्यवर तसेच दिव्यातील सर्व सामाजिक संस्था, सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर केक कापून वर्धापन दिनाचा सोहळा पार पडला. कार्यक्रमानिमित्त सर्व सभासदांनी सहकार चळवळीतील पतपेढीच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला.
संस्थेचे वार्षिक आर्थिक खेळते भांडवल ८५ कोटी रुपयांहून अधिक असून सध्या १६ हजारांहून अधिक सभासद पतपेढीशी जोडले गेले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये संस्थेचा विस्तार झाला आहे. लोअर परेल (मुंबई), वाशी, कल्याण, दिवा, उल्हासनगर, आंबिवली, नालासोपारा आणि वाई अशा एकूण आठ शाखा सध्या कार्यरत आहेत.
दिवा शाखेच्या माध्यमातून विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे. शाखेच्या प्रयत्नातून २०० ते २५० बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, या गटांना पतपेढीमार्फत आवश्यक ते कर्जपुरवठा करून स्वावलंबनाकडे वाटचाल घडवली जात आहे.

