ठाणे : ठाण्यातील ‘आपला दवाखाना’ प्रकल्पातील गंभीर अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर अखेर निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन या प्रकल्पातील ठेकेदार कंपनी मेड ऑन गो हेल्थ प्रा. लि. विरुद्ध कारवाईची मागणी केली होती. या पाठपुराव्यानंतर अखेर महापालिकेने संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकत दंडात्मक कारवाई केली आहे.
यावेळी आयुक्त राव यांनी डॉक्टर, परिचारिका आणि जागा मालकांचे थकीत पगार व भाडे दोन दिवसांत अदा करण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून थकीत देयकांमुळे त्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, ‘आपला दवाखाना’ सारख्या जनसेवेच्या उपक्रमांचा गैरवापर सहन केला जाणार नाही. नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. ठाण्यात उभारण्यात येत असलेल्या ६८ आरोग्य मंदिरांवर आयुक्तांनी स्वतः लक्ष ठेवावे, जेणेकरून या सेवांचा खरा लाभ गरजूंपर्यंत पोहोचेल,’ अशी मागणीही त्यांनी केली.
याशिवाय शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नावरही आमदार केळकर यांनी आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. अनियंत्रित फेरीवाल्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि वाढणारा अपघातांचा धोका लक्षात घेता, फेरीवाला धोरण ठराविक मुदतीत राबवावे अशी त्यांनी ठाम मागणी केली. त्यांनी असा आरोप केला की, ‘आर्थिक हितसंबंधांमुळे फेरीवाला धोरण जाणीवपूर्वक लांबवले जात आहे.’ यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदारांनी सांगितले.
या बैठकीत शहर विकासाशी संबंधित इतर अनेक महत्त्वाचे विषयही चर्चिले गेले. ढोकाळी येथे मल्टीपर्पज सेंटर उभारणीसाठी झालेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून लवकरच तेथे जिम, आरोग्य केंद्र आणि सभागृह सुरू होणार आहे. तसेच मालमत्ता विभागातील बेकायदेशीर ताब्यांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली.
ठाणे कलादालनाचे नूतनीकरण करून ‘कलर म्युझियम’ सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय तलाव सुशोभीकरणासाठी मिळालेल्या २० कोटींच्या निधीच्या वापरावर करडी नजर ठेवण्यात येईल, असे आमदार केळकर यांनी स्पष्ट केले. तसेच दिव्यांग वसतिगृह आणि धर्मवीरनगरमधील इमारतींच्या दुरुस्तीबाबतही चर्चा झाली. आमदार केळकर यांनी शेवटी सांगितले की, ‘ठाण्याचा विकास पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिक-केंद्रित असला पाहिजे. ठाणेकरांच्या हितासाठी आमचे प्रयत्न पुढेही सुरू राहतील.’


