नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलात नव्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाने २०२४-२०२५ या वर्षासाठी एकूण ५२७ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या भरतीत पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि बॅण्डस्मन या पदांचा समावेश असून, पात्र उमेदवारांकडून ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
जाहीर केलेल्या भरतीनुसार, पोलीस शिपाईच्या ४३९, चालक पोलीस शिपाईच्या ८२ तसेच बॅण्डस्मनच्या ६ जागा उपलब्ध आहेत. या सर्व पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावा लागणार आहे. भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती, पात्रता निकष, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, अर्ज प्रक्रिया आणि इतर आवश्यक मार्गदर्शक सूचना या सर्व माहिती नवी मुंबई पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळांवर – www.mahapolice.gov.in आणि policerecruitment2025.mahait.org उपलब्ध आहे.
नवी मुंबई पोलीस दलात सध्या सुमारे ४५०० पोलीस कर्मचारी आणि ३५० अधिकारी कार्यरत आहेत. शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे, विस्तारणाऱ्या नागरी परिसरामुळे आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पोलीस दलावर अतिरिक्त जबाबदाऱ्या येत आहेत. विमानतळ पोलीस ठाणे आणि उलवा पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले असून, लवकरच आणखी तीन नवीन पोलीस ठाण्यांचा समावेश होणार आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तीन परिमंडळांची रचना करून प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या ५२७ पदांच्या भरतीमुळे नवी मुंबई पोलीस दल अधिक सक्षम, तंत्रज्ञानसज्ज आणि तत्पर होईल, असा विश्वास भारंबे यांनी व्यक्त केला.
या भरती प्रक्रियेमुळे नवी मुंबईतील सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत होईल, तसेच तरुणांना पोलिस सेवेत सामील होण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शासकीय नियमांनुसार करण्यात येणार असून, पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन नवी मुंबई पोलीस दलाने केले आहे.
