गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांची उपस्थिती
नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड या तीन देशांमध्ये सेवामार्गातर्फे विश्वशांती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामुळे परदेशातील सेवेकऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे जगभरातील एकवीस देशांमध्ये अविरत कार्य चालते. सेवामार्गाचा देश- विदेश अभियान हा विभाग सेवामार्गाचा देशभर आणि परदेशात प्रचार प्रसार करण्यात महत्त्वाचे योगदान देतो.बालसंस्कार व युवा प्रबोधन प्रमाणेच देश-विदेश अभियान हा विभागही गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय आहे.
परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नितीन भाऊ यांनी एकवीस देशांमध्ये दिंडोरी प्रणित सेवामार्गाची ध्वजा फडकावली आहे. यापूर्वी नेपाळ आणि दुबईमध्ये सेवामार्गाचे भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय सत्संग मेळावे आणि विश्वशांती महोत्सव मोठ्या प्रतिसादात पार पडले. आता पुन्हा अमेरिकेसह तीन देशांमध्ये श्री. मोरे यांचा दौरा जाहीर झाल्यामुळे परदेशातील सेवेकऱ्यांना त्यांच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिली आहे. श्री मोरे यांनी यापूर्वी तीन वेळा सेवामार्गाच्या प्रचार प्रसारासाठी अमेरिकेचा दौरा केला होता शिवाय दुबई, नेपाळ, कॅनडा, नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, इंग्लंड या देशांमध्येही श्री मोरे यांनी प्रचार दौरे केले. त्यांच्या दौऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्यामुळे अमेरिकेत सेवामार्गाची अठरा सेवाकेंद्रे सुरू झाली आहेत. परदेशस्थ महाराष्ट्रीय तसेच उत्तर आणि दक्षिण भारतीय नागरिकांचा त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद लाभतो.
नोव्हेंबरमध्ये अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये दौरा
दि. ७ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील सिएटलमध्ये, दि ८ नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजलिसमध्ये, दि.९ नोव्हेंबर रोजी बे एरिया सिटीत, दि.१४ नोव्हेंबर रोजी ॲरिझोना राज्यातील फिनिक्स शहरात, दि.१५ नोव्हेंबर रोजी जॉर्जियामधील अटलांटा शहरात तर दि.१६ नोव्हेंबर रोजी कॅनडा देशातील टोरंटो ब्रामटन शहरात आणि दि.१८ नोव्हेंबर रोजी इंग्लंडमधील न्यू कॅसल शहरात गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत विश्वशांती महोत्सव होत आहे. तरी परदेशातील सेवेकर्यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
