शाळेच्या गेट समोर रस्त्यावरच्या डिव्हायडरमुळे अपघाताची भीती
मेस्टाकडून डिव्हायडर तोडण्याची मागणी
दिवा \ आरती परब : आर. एन. विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरील डिव्हायडर स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना रस्ता ओलांडताना प्रचंड गैरसोय होत आहे. तर या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना, नागरिकांना अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे आज दुपारी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (MESTA), आणि आर. एन. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रेश्मा नरेश पवार यांनी आंदोलना वेळी सांगितले की, शाळा सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात लहान मुले, पालक आणि दुचाकीस्वार या मार्गाने जातात. डिव्हाईडरमुळे रस्ता नीट विद्यार्थ्यांना ओलांडता येत नाही. तर त्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या परिस्थितीमुळे कधीही गंभीर अपघात होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
दिव्यातील बेडेकर नगर येथील चिन्मय गेट जवळ आर. एन. विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांनी, शिक्षकांनी, स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या मधोमध असलेला डिव्हाईडर तोडण्यासाठी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन केले. हे आंदोलन दोन तास सुरु असल्याने एक ते दोन किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्या आंदोलनावेळी पालिका अधिकारी फिरकले ही नाहीत. पोलीस प्रशासनाने योग्य रित्या परिस्थिती हाताळली.
या रस्त्याच्या डिव्हाईडरमुळे गेल्या काही महिन्यांआधी तेथे ट्रकच्या चाकाखाली येऊन एका वृध्दाचा मुत्यू झालेला आहे. तसेच हा डिव्हाईडर तोडण्यासाठी रेश्मा पवार यांनी पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि वाहतूक प्रशासनाकडे २०२२ पासून पाठपुरावा करत आहेत. पण अजून ही अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या डिव्हाईडरला तोडण्यात पालिका दिरंगाई करत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आजच्या दिवशी मुले, पालक आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. त्यावेळी मेस्टा संस्थेचे नरेश पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष, गजानन पाटील, कोकण विभाग अध्यक्ष, नरेश कोंडा, ठाणे जिल्हा सचिव, इतर पदाधिकारी, दिव्यातील विविध शाळा संचालक, शिक्षक तेव्हा उपस्थित होते.

