नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
ठाणे : कर्करोगाचे लवकर निदान करून त्वरित उपचारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेला फिरता कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन उपक्रम अत्यंत यशस्वी ठरत आहे. ३ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत विविध तालुक्यांत फिरत असलेल्या या व्हॅनला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात असून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मोफत आणि सुलभ कर्करोग तपासणी उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश आहे.
फिरत्या व्हॅनद्वारे मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यांसारख्या प्रमुख कर्करोगांची प्रामुख्याने तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, व्हॅनमध्ये अत्याधुनिक तपासणी उपकरणे असून प्रशिक्षित वैद्यकीय टीमद्वारे नियमित तपासण्या केल्या जातात. कर्करोगाचे प्रारंभिक अवस्थेत निदान झाल्यास उपचार पूर्णपणे प्रभावी ठरू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या व्हॅन नियोजित कार्यक्रमानुसार कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये सेवा देत आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी, आशा कार्यकर्त्या व आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
३ नोव्हेंबरपासून आजअखेरपर्यंत एकूण २,९७५ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २८ जण संशयित आढळले आहेत. संशयित रुग्णांना पुढील तपासण्या आणि आवश्यक उपचारांसाठी तत्काळ संबंधित वैद्यकीय संस्थांकडे पाठविण्यात आले आहे.
“कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर उपचार पूर्णपणे यशस्वी शक्य असतात. त्यामुळे नागरिकांनी फिरत्या व्हॅनमधील मोफत तपासणीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

