नवी मुंबईत बाल सुरक्षा सप्ताह २०२५ ची सुरुवात

 



अर्पण संस्थेचा एनएमएमसी आणि एनएमएमटीसह संयुक्त उपक्रम 


नवी मुंबई : अर्पण ही जागतिक स्तरावर नावाजलेली, एक स्वयंसेवी संस्था असून, बाल लैंगिक शोषणाची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी समर्पित आहे. नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने (एनएमएमटी) अर्पणच्या ‘बाल सुरक्षा सप्ताह’ अभियानाला पाठिंबा दर्शवताना, पोक्सोपकडलेगा अभियानातील बाल सुरक्षा संदेश प्रदर्शित करणाऱ्या १०० एनएमएमटी बसगाड्यांचे अनावरण केले.


यावर्षी लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी अर्पणच्या या अभियानाने एक धाडसी आणि अभिनव विषयावर लक्ष केंद्रित केले आहे: “जर तुम्ही कोणत्याही मुलाचे लैंगिक शोषण कराल, तर तुम्हाला पोक्सो पकडेल”. पोक्सोपकडलेगा हा आपल्या अभियानाचा हॅशटॅग असणार आहे. त्यामुळे हा केवळ एक इशारा नसून, बाल लैंगिक शोषण रोखण्याच्या दिशेने उचललेलं प्रभावी पाऊल ठरणार आहे. हे अभियान पोक्सो कायद्याचे (लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण अभियान) अस्तित्व अधोरेखित करून, या कायद्याच्या उल्लंघनाचे परिणाम किती भयावह असू शकतात, याची जाणीव करून देणार आहे. तसेच शोषणकर्त्यांनी समाजात वावरताना कुठलेही चुकीचे पाऊल उचलू नये व कायद्याचे पालन करावे, असा संदेश देणार आहे. 


हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री विद्या बालन यांनी आमच्या अभियानाला पाठिंबा दर्शवला असून, त्या यंदाच्या बाल सुरक्षा सप्ताहाचे नेतृत्व करणार आहेत. तसेच श्वेता कवात्रा, मानव गोहील आणि अनुप सोनीसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांनीसुद्धा या अभियानाला पाठींबा दर्शवला असून, त्यांनी बाल लैंगिक शोषणाविरुद्धच्या या लढ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचा निर्धार केला आहे.




या कार्यक्रमादरम्यान, बाल सुरक्षा संदेश प्रदर्शित करणाऱ्या एका विशेष एनएमएमटी बसचे अनावरण करण्यात आले. सध्याच्या घडीला नवी मुंबईमध्ये, अर्पणच्या अभियानाचे बाल सुरक्षा संदेश प्रदर्शित करणार्‍या एकूण १०० एनएमएमटी बसेस कार्यान्वित असून, त्या नवी मुंबई परिसरातील सर्वाधिक रहदारी असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण मार्गांवर धावणार आहेत. तसेच या मार्गांवर नियमितपणे प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांना बाल सुरक्षेचा संदेश देऊन, त्यांना पॉक्सो कायद्याचे महत्त्व समाजावून सांगणार आहेत. या बस जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या व्यक्तींना, त्यांच्यापासून दूर राहण्याची आणि त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन न करण्याची, सक्त ताकीद दिली जाणार आहे.


अर्पणच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापडिया याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, “बाल सुरक्षा ही कुणाच्याही भरवशावर सोडून देण्यासारखी गोष्ट नाही. तसंच ही समाजातील काही निवडक लोकांची जबाबदारी नाही. तर ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मुलांनी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक शहराने आणि प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे. नवी मुंबई परिसरात धावणाऱ्या बसगाड्यांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाने हे दाखवून दिलं आहे की, मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या समान ध्येयासाठी, जेव्हा शासकीय अधिकारी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सामाजिक संस्था एकत्रितपणे काम करतात, तेव्हा या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतात. 



आमच्या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि नवी मुंबई वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून आम्हाला बाल सुरक्षेचा संदेश पसरवण्याची संधी दिल्याबद्दल, आम्ही नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. पोक्सोपकडलेगा या अभियानाच्या माध्यमातून, आम्ही बाल लैंगिक शोषणाविषयी जनजागृती करण्याचे ध्येय ठेवले असून, यानिमित्ताने देशातील नागरिकांना मुलांच्या सुरक्षेप्रती सजग बनवले जाणार आहे. तसेच शोषणकर्त्यांना त्यांच्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला लावणे, हादेखील आमचा या उपक्रमामागील आणखी एक हेतू आहे. ही जागरूकता फार गरजेची आहे, कारण जर सामान्य नागरिकांनी हा कायदा समजून घेतला आणि योग्य वेळी त्याचा वापर केला, तरच त्याची खऱ्या अर्थाने प्रभावी अंमलबजावणी होणं शक्य आहे.”  






Post a Comment

Previous Post Next Post