अवैध स्त्रीबीज विक्री प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाची आढावा बैठक
बदलापूर : शहरातील मुली व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घडलेल्या अलीकडील घटनांचा तसेच नुकत्याच उघडकीस आलेल्या अवैध स्त्रीबीज विक्री प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
एमएमआर अर्थात मुंबई महानगर प्रदेशचा भाग असलेल्या बदलापूर शहराची गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली असून शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे विविध सामाजिक समस्या समोर येत असून शिक्षण विभागाची परवानगी न घेता सुरू असलेली प्री-स्कूल्स, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे आवश्यक परवानगी नसणे, बेकायदेशीररित्या सुरू असलेली लहान रुग्णालये तसेच समुपदेशन केंद्रांची गरज अशा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
प्री-स्कूलच्या परवानगीची तपासणी, विद्यार्थ्यांच्या वाहतूक वाहनांची पडताळणी तसेच खासगी सोनोग्राफी केंद्रांची तपासणी तातडीने हाती घेण्याच्या सूचना शिक्षण, आरोग्य आणि पोलीस विभागाला देण्यात आल्या. महिला व बालसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते ठराव करून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही देण्यात आले.
महिलांना कौटुंबिक त्रासाच्या प्रकरणांमध्ये मदत मिळावी यासाठी बदलापूरमध्ये संरक्षण अधिकाऱ्यांचे कार्यालय तसेच समुपदेशन केंद्र तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
दरम्यान, बदलापूर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अवैध स्त्रीबीज विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. गरीब व गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून आरोपींकडून एका घरातून हे रॅकेट चालवले जात असल्याचे निष्पन्न झाले असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अवैधरित्या इंजेक्शन व औषधांचा पुरवठा करण्यात येत होता. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनानेही तातडीने कारवाई करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीस कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, मुख्याधिकारी मारुती गायकवाड, पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, स्त्रीबीज विक्री प्रकरणाचे तपास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


