राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेशी नाळ जोडलेल्या परिवाराचा प्रवास


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा अजित पवार यांची निवड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या ‘राष्ट्रीय अधिवेशन २०२६’ मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सर्वानुमते उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून विचारांचा, संघर्षाचा आणि जनतेशी नाळ जोडलेल्या परिवाराचा प्रवास असल्याचे नमूद करत पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

हा क्षण सन्मानाचा असला तरी मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे सांगत लाखो कार्यकर्त्यांच्या आशा-अपेक्षा, पक्षाची विचारधारा आणि जनतेच्या सेवेसाठीची बांधिलकी अधिक बळकट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पूर्ण निष्ठा, समर्पण आणि प्रामाणिकतेने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी अहोरात्र कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आपल्या लाडक्या नेत्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही मनाला अस्वस्थ करत असल्याची भावना व्यक्त करत महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या नेतृत्वाची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सामूहिक शक्तीने प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून विचारांचा, संघर्षाचा आणि जनतेशी नाळ जोडलेल्या परिवाराचा प्रवास असल्याचे नमूद करत शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण तसेच शहरी भागात पक्ष अधिक सक्षम करणे, तरुणांना संधी देणे, महिलांचे सक्षमीकरण तसेच कृषी, सहकार, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवे पर्व सुरू करण्याची दिशा त्यांनी मांडली.

शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला योग्य दिशा देत पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणे हे आपले ध्येय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दादांनी जसा पक्ष जपला, तसाच जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगत एकजुटीने, धैर्याने आणि निष्ठेने प्रगत, समावेशक आणि सक्षम महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन त्यांनी केले.




Post a Comment

Previous Post Next Post