ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
ठाणे : ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी मुरबाड रेल्वे प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीस खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) तसेच जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ (ठाणे) प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी अपेक्षित एकूण खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जमीन संपादन व भूसंपादन प्रक्रिया, प्रस्तावित रेल्वे मार्ग, पूरक सुविधा आणि संबंधित पायाभूत कामांसाठी होणाऱ्या अचूक खर्चाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती सादर करण्यात आली.
राज्य शासनाच्या वतीने नव्याने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवरही यावेळी चर्चा झाली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी, प्रशासकीय प्रक्रिया आणि निधी नियोजनासंदर्भात सूचना मांडल्या. बैठकीस रेल्वे विभाग तसेच भूसंपादन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पाला गती देण्यासाठी परिपूर्ण व अचूक खर्च निश्चितीचा प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा, अशा स्पष्ट सूचना खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिल्या. मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी हा रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून तो वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.


