ठाण्यातील प्रभाग क्र.२ मध्ये ‘डीप क्लीन ड्राईव्ह’
ठाणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली सर्वंकष स्वच्छता मोहीम ठाण्यात अविरतपणे सुरू असून आज प्रभाग क्र. २ मध्ये महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ राबविण्यात आली. “माझे शहर स्वच्छ राखण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे,” अशी स्वच्छतेची शपथ घेऊन मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
या मोहिमेस प्रभाग क्र. २ मधील स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे, अर्चना मणेरा, कमल चौधरी, विकास पाटील यांच्यासह परिमंडळ उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त मधुकर बोडके उपस्थित होते.महापौरांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच कोपरी प्रभागातून स्वच्छता मोहिम हाती घेतली होती. महापालिका हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज प्रभाग क्र. २ मधील रुतू इस्टेट ते काबरा सर्कल, काबरा सर्कल ते महाराणा प्रताप चौक, काबरा सर्कल ते आझादनगर सर्कल, श्री मॉ शाळा ते रोडाझ सोसायटी, पातलीपाडा ब्रिज ते कै. चिमा बाबू दळवी चौक ते श्री मॉ शाळा व देव भक्ती सोसायटी परिसर, महाराणा प्रताप चौक ते रिजेन्सी टॉवर मार्गे शिवनेरी सोसायटी तुर्फा पाडा, तसेच श्री दुर्गा माता मंदिर रोड ते ब्रह्मांड सर्कल मुख्य रस्ता आदी भागांत सर्वंकष स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सर्व प्रभागांमध्ये नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या मोहिमेत प्रथम रस्त्यांची साफसफाई करून त्यानंतर पाण्याच्या सहाय्याने धुलाई करण्यात आली. यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला. आर्यन जेटिंग गाडी, रस्ते स्वीपिंग मशीन, दोन लहान घंटागाड्या तसेच औषध फवारणीच्या माध्यमातून ही डीप क्लीन ड्राईव्ह प्रभावीपणे पार पाडण्यात आली.
यावेळी मुख्य स्वच्छता निरीक्षक शयूराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी यांच्यासह सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसर अधिक स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


