गावदेवी मैदान येथे राज्यस्तरीय PMEGP प्रदर्शनाचे उद्घाटन

 


ठाणे : खादी व ग्रामोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी गावदेवी मैदान, नौपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) प्रदर्शनाचे उद्घाटन ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.


या उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक संजय वाघुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करणारे तरुण-तरुणी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


राज्यभरातील उद्योजकांनी या प्रदर्शनात खादी वस्त्र, हस्तकला, सेंद्रिय उत्पादने, ग्रामीण उद्योगातून तयार केलेल्या विविध उपयुक्त वस्तू तसेच गृहउद्योगातील नाविन्यपूर्ण उत्पादनांचे आकर्षक स्टॉल्स उभारले आहेत. प्रत्येक स्टॉलमधून ग्रामीण भागातील कौशल्य, मेहनत आणि आत्मनिर्भरतेची जाणीव प्रकर्षाने दिसून येत आहे.


‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला चालना देणारा हा उपक्रम स्थानिक उद्योगांना बळकटी देणारा ठरत आहे. या प्रदर्शनामुळे ग्राहकांना थेट उत्पादकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली असून उद्योजकांनाही आपल्या उत्पादनांची व्यापक ओळख निर्माण करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे. या उत्कृष्ट आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.




Post a Comment

Previous Post Next Post