दिव्यात थकबाकीदारांवर थेट कारवाई



कर निरीक्षक ललिता जाधव यांची धडक मोहीम 

दिवा \ आरती परब : आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर वसुलीला गती देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने दिवा परिसरात मोठी धडक कारवाई केली. कर निरीक्षक ललिता जाधव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कारवाईत मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या अनेक व्यावसायिक गाळ्यांना सील ठोकण्यात आले.


दिवा प्रभाग समिती हद्दीत महापालिकेच्या कर विभागाने पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबवली. ज्या व्यावसायिक गाळ्यांवर मोठ्या प्रमाणात कर थकबाकी होती, त्या सर्व गाळ्यांवर कारवाई करत त्यांचे शटर सील करण्यात आले. तसेच प्रत्येक गाळ्यावर अधिकृत नोटीस चिकटवून थकबाकीची माहिती देण्यात आली.


महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, ही कारवाई कोणत्याही एकाच दुकानापुरती मर्यादित नसून सर्व थकबाकीदारांवर समान पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


सील केलेल्या गाळ्यांवर लावलेल्या नोटीसमध्ये महापालिकेने कडक इशारा दिला असून, पूर्वपरवानगीशिवाय सील तोडल्यास संबंधितांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.


दरम्यान, आर्थिक वर्ष संपत आल्याने महापालिकेने कर वसुली मोहीम अधिक तीव्र केली असून, थकबाकीदारांनी तात्काळ कर भरून दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post