रुग्णालयांमध्ये उष्माघातासाठी राखीव खाटा उपलब्ध
जळगाव : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील नागरिकांना तात्काळ आणि योग्य आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी महापौर दिपमाला काळे यांनी छत्रपती शाहू महाराज रुग्णालय आणि भिकमचंद जैन प्रसूतीगृह येथे भेट देऊन आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
छत्रपती शाहू महाराज रुग्णालयातील कार्डियोलॉजी, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, मेडिसिन, एक्स-रे, सोनोग्राफी, बालरोग विभाग, सुपर स्पेशालिटी विभाग, शस्त्रक्रिया गृह, अतिदक्षता विभाग (ICU) तसेच प्रयोगशाळा आदी सर्व विभागांची पाहणी करण्यात आली. रुग्णालयातील स्वच्छता, उपलब्ध मनुष्यबळ आणि अत्याधुनिक सुविधा पाहून समाधान व्यक्त करण्यात आले. रुग्णांच्या सोयीसाठी लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांचेही कौतुक करण्यात आले.
यानंतर शिवाजीनगर येथील भिकमचंद जैन प्रसूतीगृह येथे भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या येथे केवळ क्षयरोग विभागाची ओपीडी सुरू असून प्रसूतीगृह पुन्हा सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे यावेळी सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या मनुष्यबळाच्या कमतरतेबाबत प्रशासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
वाढत्या तापमानाचा विचार करून उष्माघात (Heat Stroke) कक्षाची तयारी तपासण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाहू महाराज रुग्णालयात ४ खाटा आणि भिकमचंद जैन रुग्णालयात ७ खाटा उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, उष्माघाताची कोणतीही लक्षणे जाणवल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या महानगरपालिका रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत.


