जळगावमध्ये ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ


१४ वर्षांपर्यंतच्या मुलींना लस मोफत

जळगाव : मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने एचपीव्ही (Human Papilloma Virus) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शाहू महाराज रुग्णालय येथे करण्यात आला. या मोहिमेत १४ वर्षांपर्यंतच्या मुलींना शासकीय आरोग्य संस्थांमध्ये एचपीव्ही लस विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एक महत्त्वाचा आजार आहे. योग्य वयात एचपीव्ही लसीकरण केल्यास या आजारापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते. त्यामुळे जळगाव शहरातील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलींचे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



खासगी रुग्णालयांमध्ये ही लस तुलनेने महाग असते; मात्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी ही लस शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही सांगण्यात आले. या कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा उगले, आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर व परिचारिका उपस्थित होत्या. पालकांनी U-WIN डिजिटल प्लॅटफॉर्म (uwin.mohfw.gov.in) वर नोंदणी करून आपल्या मुलींना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.


मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून निरोगी आणि सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी अशा आरोग्यविषयक उपक्रमांना सर्वांनी सहकार्य करावे, असे मत महापौर दिपमाला काळे यांनी व्यक्त केले.



Post a Comment

Previous Post Next Post