ब्रह्मानंद म्हात्रे यांच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना रोबोटिक्सची गोडी
मुंबई \ कविता गरूड : ‘दिव्यांगत्व म्हणजे असमर्थता नव्हे, तर संधी मिळाल्यास आपली क्षमता सिद्ध करण्याची ताकद आहे,’ या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मेकॅट्रॉनिक्स तज्ज्ञ व रोबोटिक्स प्रशिक्षक ब्रह्मानंद रवींद्र म्हात्रे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान शिक्षणाचा अनोखा उपक्रम राबविला आहे. रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रोग्रामिंग, हार्डवेअर आणि नेटवर्किंग या क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा उपयोग त्यांनी सामाजिक योगदानासाठी केला आहे.
म्हात्रे यांना तांत्रिक क्षेत्रात तब्बल ३३ वर्षांचा अनुभव असून, त्यापैकी १७ वर्षे उच्च शिक्षण क्षेत्रात, तर १६ वर्षे उद्योग क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. सध्या ते एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस विद्यापीठातील मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या मेकॅट्रॉनिक्स विभागात कार्यरत आहेत.
म्हात्रे यांनी २१ एप्रिल २०२५ रोजी केडीएम श्रुती स्कूल फॉर द डेफ येथे प्रथमच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्सचा उपक्रम राबविला. वयाने लहान असलेल्या या विद्यार्थ्यांनी २डी व्हील, छोट्या गाड्या आदी विविध उपकरणे तयार केली. या उपक्रमाला शाळेचे शिक्षक, प्राचार्य आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे हा उपक्रम पूर्णपणे विनामूल्य आयोजित करण्यात आला होता.
यानंतर २८ सप्टेंबर २०२५ रोजी भायखळा येथील एम. एस. साबू सिद्दीक कॉलेजमध्ये ‘वॉक टू टॉक’ या उपक्रमांतर्गत बी.ई. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
२० डिसेंबर २०२५ रोजी द स्टीफन स्कूल फॉर द डेफ अँड अल्फासिक येथील आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टेक टॉक’ या विषयावर रोबोटिक्स कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी फ्लेक्स सेन्सरचा प्रयोग केला. एखाद्या विद्यार्थ्याला पाणी हवे असल्यास त्याने विशिष्ट पद्धतीने बोट वाकविल्यावर शिक्षकांना त्याची गरज समजावी, अशी संकल्पना या तंत्रज्ञानातून साकारण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः फ्लेक्स सेन्सर तयार करण्याबरोबरच हात न लावता उघडता-बंद करता येणारा डस्टबिन आणि स्मार्ट डस्टबिन यांसारखी उपकरणेही तयार केली.
द स्टीफन स्कूल फॉर द डेफ अँड अल्फासिक येथे पुन्हा रोबोटिक्सच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक डिजिटल मतदान यंत्रणा (ई-बोर्ड) तयार करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. यापूर्वी शाळेतील विद्यार्थी चिठ्ठ्यांद्वारे मतदान करीत होते. विद्यार्थ्यांना स्वतःहून मतदान करता यावे, अशी मशीन तयार करण्याची गरज शिक्षकांनी व्यक्त केली. त्यानुसार म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून डिजिटल मतदान मशीन तयार केली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या मशीनचा वापर आता शाळेतील निवडणुकांसाठी केला जात आहे.
दिव्यांगांसाठी तंत्रज्ञानाचा वापर केवळ शिक्षणापुरता मर्यादित न ठेवता त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी सोडविण्यासाठीही म्हात्रे यांनी संशोधन केले आहे. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग चालकांसाठी वाहनाची सुरक्षितता आणि आराम वाढविणाऱ्या तंत्रज्ञानावर त्यांनी पेटंटसाठी अर्ज केला आहे. टाटा नॅनोच्या मागील सस्पेन्शनमध्ये स्प्रिंग बूस्टरचा वापर करून खड्डे आणि असमतल रस्त्यांमुळे होणारे धक्के कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
दिव्यांग व्यक्तींना पायांचा वापर न करता वाहन चालविता यावे, यासाठी नॅनो कारमध्ये विशेष तांत्रिक बदल करण्यात आले असून, या संशोधनासाठीही पेटंट दाखल करण्यात आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ‘टेक फॉर डिसॅबिलिटी इन्क्लूजन’ परिषदेत त्यांनी आपल्या कार्याचे सादरीकरण केले आहे.
८ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त टीआयआयटी क्लासेसमध्ये महिलांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय विषयावरील उपक्रम राबविण्यात आला. तसेच कोडमाइन्स आणि ८ ऑगस्ट २०२६ रोजी श्री. एल. आर. तिवारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे रोबोटिक्स व आयओटी विषयावर कार्यशाळाही त्यांनी घेतली.
कार्याची दखल
ब्रह्मानंद म्हात्रे यांच्या या सामाजिक व तांत्रिक कार्याची दखल घेत ‘जिब्रान फाउंडेशन’तर्फे ‘भारतरत्न आयकॉनिक अवॉर्ड’ जाहीर करण्यात आला आहे. म्हात्रे यांचे कार्य केवळ पुरस्कारासाठी नसले, तरी त्यांच्या या बहुमोल सामाजिक कार्याची शासन व विविध संस्थांनी पुरस्कारांच्या माध्यमातून दखल घेतल्यास त्यांना त्यांच्या कार्याची मोठी पोचपावती मिळेल. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षमतेला तंत्रज्ञानाची जोड देत त्यांच्यात आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करण्याचे म्हात्रे यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.



