सह्याद्री समाज आणि मोमाझोनच्या पुढाकार
दिवा \ आरती परब : विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन शिळ आणि दिवा येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक २६ आणि ८१ मध्ये विद्यार्थ्यांसाठी शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सह्याद्री समाज आणि मोमाझोन, मुंबई यांच्या संयुक्त पुढाकारातून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
शाळा क्रमांक ८१ च्या मुख्याध्यापिका वंदना बाऊस्कर यांनी विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन सह्याद्री समाजाचे महासचिव मंगेश अवथळे यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. शाळेची गरज लक्षात घेऊन सह्याद्री समाजाने मोमाझोन संस्थेच्या सहकार्याने शाळेत २५० एलपीएच (लिटर प्रति तास) क्षमतेची जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून दिली. या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या सुमारे १२०० आहे.
या प्रकल्पासाठी मोमाझोन संस्थेने आर्थिक सहकार्य व प्रायोजकत्व दिले, तर संपूर्ण उपक्रमाचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी सह्याद्री समाजाने केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ, सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
या प्रसंगी ठाणे महानगरपालिका शाळेचे गटप्रमुख उमाकांत कुडे, क्लस्टर संसाधन केंद्र समन्वयक गिरीश शेलार, मुख्याध्यापिका वंदना बाऊस्कर, मोमाझोनच्या संस्थापक प्रियंका गुप्ता, सहकारी अमित कडू आणि सह्याद्री समाजाचे महासचिव मंगेश अवथळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांना सुरक्षित आणि चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे आरोग्य, शिक्षण आणि उज्ज्वल भवितव्य यासाठी भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस सह्याद्री समाज आणि मोमाझोन संस्थेने व्यक्त केला. “निरोगी विद्यार्थी, सुरक्षित भविष्य आणि उत्तम शिक्षण, हीच आमची बांधिलकी!” असे सह्याद्री समाजाचे महासचिव मंगेश अवथळे यांनी सांगितले.
