वंचित मुलांसोबत प्रशांत भागवत यांचा वाढदिवस साजरा


५६ व्या वाढदिवसानिमित्त डंपिंग ग्राउंड परिसरातील मुलांना केक, खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिवा \ आरती परब : स्वतःचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याऐवजी वंचित मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करण्याचा स्तुत्य उपक्रम केडीएमसीचे अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत व यांत्रिकी) प्रशांत भागवत यांनी राबविला. आपल्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी डंपिंग ग्राउंड परिसरात राहणाऱ्या कष्टकरी कुटुंबांतील मुलांसोबत वाढदिवस साजरा केला.

अनुबंध सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात प्रशांत भागवत यांनी पत्नीसमवेत मुलांसोबत केक कापून आनंद साजरा केला. यावेळी मुलांना खाऊ, भेटवस्तू तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूसही केली. या अनोख्या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.

वाढदिवसासारखा वैयक्तिक आनंदाचा क्षण समाजातील गरजू घटकांसोबत साजरा करून प्रशांत भागवत यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता वाढदिवस मर्यादित न ठेवता समाजातील वंचित मुलांच्या आनंदात सहभागी होण्याचा त्यांचा हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरला.

या उपक्रमाबद्दल अनुबंध सामाजिक संस्थेने प्रशांत भागवत यांचे आभार मानले. वैयक्तिक आनंदाला सामाजिक सेवेची जोड देत गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा हा उपक्रम समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श ठेवणारा ठरला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post