संजय फाऊंडेशनच्या ‘एक फराळ सफाई दूतांसह’ उपक्रमाचे दहावे वर्ष; गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान
ठाणे / MAHARASHTRA WEBNEWS
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संजय फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘एक फराळ सफाई दूतांसह’ या उपक्रमाने यंदा दहाव्या वर्षात पदार्पण केले. दिवाळीच्या आनंदात स्वच्छता दूतांनाही सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील कामगार खाडी, पेटी क्रमांक २ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार संजय केळकर यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत दिवाळीचा फराळ केला. त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत स्वच्छता दूतांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांच्या हक्कांच्या आणि न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ प्रशासनाकडे वेळोवेळी आवाज उठवला आहे. या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांच्याकडून मिळणारे प्रेम हीच आपल्यासाठी मोठी कमाई असल्याची भावना संजय केळकर यांनी व्यक्त केली.
‘सफाई कामगार’ या संबोधनापेक्षा ‘स्वच्छता दूत’ हा शब्द अधिक समर्पक असल्याचे सांगत, शहराचे आरोग्य आणि स्वच्छता राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी हे कर्मचारी पार पाडत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः कोरोनाच्या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी केलेली सेवा विसरता येणार नाही, असेही ते म्हणाले. त्या काळात संस्कार संस्थेच्या माध्यमातून काही स्वच्छता दूतांचा तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान करण्याची संधी मिळाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
यावेळी महापालिका अधिकारी लक्ष्मण पुरी यांनी महाभारतातील संजयचा संदर्भ देत कामगारांच्या भवितव्याची जाणीव ठेवणाऱ्या संजयचा उल्लेख केला. त्यांचे हे शब्द उपस्थितांच्या मनाला भावल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजनात नगरसेविका उषा वाघ, विशाल वाघ आणि संजय फाऊंडेशनचे महेश विनेरकर यांचे विशेष योगदान होते. कार्यक्रमाला नगरसेविका नम्रता कोळी, जयेंद्र कोळी, माजी नगरसेवक संतोष साळवी, नितीन ढमाले, रक्षा यादव, परेश कोळी, महापालिकेचे संजीव रणदिवे यांच्यासह मोठ्या संख्येने स्वच्छता दूत उपस्थित होते.
सण-उत्सवांचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि शहरासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छता दूतांच्या आयुष्यातही दिवाळीचा आनंद फुलावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सलग दहा वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमातून स्वच्छता दूतांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.



