दातिवली तलावाच्या विद्रुपीकरणा विरोधात मनसेच्या लढ्याला यश



महापालिकेकडून हटविण्याच्या कारवाईला सुरुवात!

दिवा \ आरती परब : दिवा शहरातील दातिवली तलाव परिसरात छठपूजेच्या निमित्ताने उभारण्यात आलेले सिमेंट व मातीचे अनधिकृत चौथरे तसेच ऑईल पेंटने करण्यात आलेले रंगकाम आणि नावे व नंबर लिहून केलेले विद्रुपीकरण हटविण्याच्या कारवाईला ठाणे महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याप्रकरणी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, तलाव परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे पूर्णपणे हटविण्याची मागणी मनसेने कायम ठेवली आहे.

दातिवली तलाव परिसरात छठपूजेच्या निमित्ताने सिमेंट व मातीचे चौथरे तयार करण्यात आले होते. त्यावर ऑईल पेंटच्या पट्ट्या मारून नावे आणि क्रमांक लिहिण्यात आले होते. त्यामुळे तलावाच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहोचत असून परिसराचे विद्रुपीकरण होत असल्याचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला होता.


यासंदर्भात मनसे दिवा शहराच्या वतीने उपशहर अध्यक्ष किरण दळवी यांच्या नेतृत्वाखाली विभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम यांनी दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदन दिले होते. तलाव परिसरातील अनधिकृत चौथरे हटवावेत, रंगकाम व अन्य प्रकारचे विद्रुपीकरण तातडीने थांबवावे, तसेच छठपूजेसाठी स्वतंत्र जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती.

या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज वॉर्ड ऑफिसर यांची भेट घेतली. मनसेने केलेल्या तक्रारीची दखल घेत महापालिका प्रशासनाने तलाव परिसरातील विद्रुपीकरण हटविण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे.

मात्र, ही कारवाई केवळ दिखाऊ किंवा थातुरमातुर स्वरूपाची असू नये. तलाव परिसरातील सर्व अनधिकृत चौथरे आणि विद्रुपीकरण पूर्णपणे हटवून तलावाचे मूळ नैसर्गिक सौंदर्य जपावे. भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. अन्यथा मनसेला अधिक आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा स्पष्ट इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.


धार्मिक उत्सवांना मनसेचा विरोध नसून, धार्मिक विधींच्या नावाखाली सार्वजनिक नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होऊ नये, ही पक्षाची भूमिका आहे. तलाव हे शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे नैसर्गिक जलस्रोत असून त्यांचे संवर्धन करणे ही महापालिका प्रशासनासह नागरिकांचीही जबाबदारी असल्याचे मनसेने स्पष्ट केले.

यावेळी महिला उपशहर अध्यक्ष नम्रता खराडे, विभाग सचिव सुशांत तांडेल, उपविभाग अध्यक्ष धनेश पाटील, शाखाध्यक्ष विराज पाटील, रमेश शिंदे, विशाल दुडाम यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post