जळगाव-पुणे मार्गावरील खासगी बसचे दर वाढले
जळगाव / MAHARSHTRA WEBNEWS
दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी पुणे, मुंबईसह विविध शहरांतून जळगावला येणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यंदा प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. दिवाळीच्या सुट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने जळगाव-पुणे मार्गावरील खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीटदरात मोठी वाढ झाली आहे. ऐन दिवाळीत पुण्याहून जळगावला येण्यासाठी विमान तिकिटांची उपलब्धताही संपली असून, रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे.
उपलब्ध भाडेदरांच्या तुलनेनुसार, पुणे-जळगाव मार्गावरील एसी स्लीपर बसचे तिकीट गर्दीच्या काळात सुमारे १,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सामान्य दिवसांत याच प्रवासासाठी सुमारे ९०० रुपये खर्च येतो. म्हणजेच दिवाळीच्या गर्दीमुळे एका प्रवाशाला जवळपास ६०० रुपये अधिक मोजावे लागत आहेत.
राज्यातील अन्य मार्गांवरही दिवाळीच्या काळात खासगी बसच्या तिकीटदरात नियमित भाड्याच्या तुलनेत दोन ते तीन पट वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. काही मार्गांवर सामान्यतः ७०० रुपये असणारे तिकीट चार हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. तर काही ठिकाणी सहा ते सात हजार रुपयांपर्यंत दर आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण आधीच फुल्ल झाल्याने अनेकांना खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, वाढीव भाड्यामुळे कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांच्या खर्चात मोठी भर पडत आहे. विशेषतः नोकरी आणि शिक्षणानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या जळगावकरांना या दरवाढीचा फटका बसत आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन खासगी बसचालकांकडून होणाऱ्या अवाजवी भाडे आकारणीवर परिवहन विभागाने लक्ष ठेवावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी गावी येतानाच प्रवाशांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसत असल्याचे चित्र आहे.
