ठाणे (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा "गुणगौरव सोहळा" सोमवारी सायंकाळी सी.के.पी. हॉल, एन.के.टी. कॉलेजजवळ, खारकर आळी, ठाणे (प.) येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात ठाणे शहरातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून यंदा दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक, शिक्षकवर्ग, स्थानिक नागरिक आणि मनसेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात मनसे पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारे मार्गदर्शन केले. मनसे ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "विद्यार्थ्यांचा हा यशाचा टप्पा म्हणजे केवळ सुरुवात आहे. शिक्षणाच्या बळावर हे विद्यार्थी देश आणि समाज घडवतील, असा विश्वास वाटतो."
गुणवंत विद्यार्थ्यांनीही आपल्या संघर्षाची आणि मेहनतीची कहाणी उपस्थितांसोबत शेअर करत प्रेरणादायी अनुभव सांगितले. काही विद्यार्थ्यांनी आर्थिक अडचणींवर मात करत, काहींनी सामाजिक अडथळ्यांना झुगारून हे यश संपादन केल्याचे सांगितले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.